उद्योगनगरीत पासपोर्ट केंद्र ठरतेय फायदेशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 03:28 AM2018-07-22T03:28:31+5:302018-07-22T03:28:48+5:30
पोस्टाच्या कार्यालयात सेवा; पिंपरी-चिंचवडमधील ५० हजार ६५२ जाणांना मिळाला लाभ
पिंपरी : पिंपरी येथे केंद्र सरकारच्या विदेश मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू झालेले पासपोर्ट सेवा पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरातील नागरिकांसाठी फायदेशीर ठरत आहे. या पासपोर्ट केंद्रातून अद्यापपर्यंत ५० हजार ६५२ जणांना पासपोर्ट देण्यात आला आहे.
शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी २ एप्रिल २०१७ ला हे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाले. या अगोदर पुण्यातील मुंढवा येथे पासपोर्ट कार्यालयात नागरिकांना जावे लागत होते. नागरिकांचा संपूर्ण दिवस त्यासाठी खर्ची पडत होता़ त्याच बरोबर पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना मुंढवा येथे जाणे गैरसोयीचे होते. त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. पिंपरी येथे पासपोर्ट कार्यालय झाल्याने पिंपरी-चिंचवड बरोबरच मावळ, चाकण, हिंजवडी या भागातील नागरिकांनाही हे पासपोर्ट कार्यालय सोयीचे ठरत आहे.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून खराळवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर टपाल कार्यालयातच पासपोर्ट सेवा केंद्र सुरू केले आहे. हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने नागरिकांसाठी सोयीचे ठरत आहे.
यापूर्वी पासपोर्ट काढण्यासाठी मोठी धावपळही करावी लागत होती. आता मात्र जवळच कार्यालय सुरू झाल्याने देशाबाहेर जाण्याचे नियोजित नसले तरीही अनेक जण पासपोर्ट काढून ठेवत आहेत.
शहरातील अथवा मावळातील एखाद्या व्यक्तीला मुंढव्याला पासपोर्ट काढण्यासाठी जायचे असल्यास एक ते दोन तासाचा वेळ जायचा. यामध्ये वाहतूककोंडीचाही सामना करावा लागत होता. वेळेअभावी अनेकदा एका कामासाठी अनेक फेºया माराव्या लागायच्या. आता मात्र, पिंपरीतील केंद्रामुळे वेळेची व खर्चाचीही बचत होत असून, धावपळही होत नाही.
>सध्या विमान प्रवास करणाºयांची संख्या वाढली आहे. देशांतर्गत तसेच देशाबाहेर अनेक जण विमानाने प्रवास करतात. देशाबाहेर प्रवास करण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता असते. यापूर्वी नव्याने पासपोर्ट काढण्यासाठी पुण्यात जावे लागत. आता मात्र, पिंपरीतच ही सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे अनेकांचा पासपोर्ट काढण्याकडे कल वाढला आहे.
>या कार्यालयात २ एप्रिल २०१७ पासून आतापर्यंत पासपोर्टसाठी ५८ हजार २४८ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर ५० हजार ६५२ जणांना पासपोर्ट दिले आहेत.
>पिंपरीतील पासपोर्ट केंद्र २ एप्रिल २०१७ ला सुरू झाले असून, अद्यापपर्यंत येथे पासपोर्टसाठी ५८ हजार २४८ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर ५० हजार ६५२ जणांना पासपोर्ट दिले आहेत. दररोज १०० अपॉइंटमेंट असतात. या केंद्रातून पासपोर्ट घेण्यासाठी अर्ज सादर करणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.