आयटी परिसर : महापालिकेच्या जागेत अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 12:18 AM2018-10-05T00:18:43+5:302018-10-05T00:19:09+5:30
आयटी परिसर : कारवाईची प्रशासनाकडे मागणी
पिंपरी : आयटीनगरी हिंजवडी, वाकड परिसरातील अनेक सोसायट्यांनी महापालिकेच्या जागेत अतिक्रमण केले आहे. आरक्षणांवर बांधकामे होत आहेत. त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. या विषयी महापालिकेस सजग नागरिकांनी पत्र दिले आहे. महापालिकेचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर सोसायट्यांच्या आवारातच मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकामे थाटली आहेत. वाकड परिसरात हे प्रमाण अधिक आहे. वाकडमधील एका सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुमारे चार गुंठे मोकळी जागा आहे. बांधकाम व्यावसायिकाने मोबदला घेऊन ती जागा महापालिकेला हस्तांतरित केली आहे. या जागेचा सातबारा महापालिकेच्या नावावर असताना या सोसायटीतील काही लोकांनी बांधकाम केले आहे.
आरक्षित जागांना कुंपण कधी?
महापौर राहुल जाधव यांनी काही दिवसांपूर्वी आरक्षणांच्या जागा ताब्यात घ्या, असे निर्देश दिले असताना अजूनही आरक्षित जागांना कुंपण करण्याचे काम पूर्ण केलेले नाही. अनधिकृत बांधकामे निर्मूलनासाठी महापालिकेने बिट निरीक्षक नियुक्त केले आहेत. हे पथक गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेच्याच जागेत अतिक्रमण करून बेकायदा गाळे बांधले आहेत.
आरक्षणे ताब्यात न घेतल्याचा परिणाम
वाकड परिसरातील अनेक जागा महापालिकेच्या आहेत. त्या ताब्यात घेतलेल्या नाहीत. आरक्षणांचा विकास केलेला नाही, अशा अनेक जागांवर अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. तक्रार झाल्यानंतर बांधकामांवर कारवाई होते. कारवाईनंतर ही बांधकामे पुन्हा उभी राहतात. त्यात स्थानिक नागरिकांची फूस असते. स्थानिकांचा आधार घेऊन विविध गृहनिर्माण सोसायट्या आरक्षित जागांवर स्वत:ची दुकाने थाटत आहेत. वाढीव बांधकामे करीत आहेत.