आयटी सिटीत अल्पवयीन मुली असुरक्षितच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 01:24 AM2018-09-21T01:24:42+5:302018-09-21T01:25:04+5:30
अल्पवयीन मुली अत्याचाराच्या बळी पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे.
पिंपरी : अल्पवयीन मुली अत्याचाराच्या बळी पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. कधी घरातील, नात्यातील वासनांध व्यक्ती, तर कधी शेजाऱ्यांच्या अत्याचाराला बळी पडणाºयांमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण अधिक आहे. घरात आणि बाहेरसुद्धा लहान मुली असुरक्षित असल्याचा प्रत्यय वारंवार घडणाºया घटनांमधून येऊ लागला आहे. हिंजवडीत बारा वर्षांच्या दोन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना घडली. त्यातील एका मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने पुन्हा एकदा अल्पवयीन मुली असुरक्षितच असल्याचे स्पष्ट आले आहे.
हिंजवडी आणि वाकड परिसरात वर्षभरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना अधिक प्रमाणात घडू लागल्या आहेत. मागील आठवड्यात एका आयटी अभियंत्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना, याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. दगड कापण्याचे यंत्र हवे असल्याचा बहाणा करून एक तरुण घरात शिरला. पाहुणी आलेली अल्पवयीन मुलगी घरात एकटीच होती. मदतीला लगेच कोणी धावून येणार नाही, याचा अंदाज बांधून आरोपीने घरात शिरून जिवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना भरदिवसा पवारनगर, थेरगाव येथे घडली होती.
वाकडमध्ये एक महिन्यापूर्वी आरोपीने घरात शिरून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. मध्यरात्री दोनच्या सुमारास आरोपीने पीडित मुलीच्या घराचा दरवाजा ठोठावला. मुलीच्या आईने दरवाजा उघडला. आरोपीने तिच्या आईला ढकलून दिले. घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर आरोपीने अतिप्रसंग केला. जन्मदात्या पित्यानेच पोटच्या अल्पवयीन कर्णबधिर मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या नराधम पित्याला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. पीडित मुलीची आई घरकाम करण्यासाठी पहाटे घरातून बाहेर पडत असे. दिवसभर घरात कोणी नसल्याने आरोपीने १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. सात आठ महिने पित्याचे गैरकृत्य सुरू होते. हा प्रकार मुलीने आईला सांगितला. आईने पोलिसांकडे धाव घेऊन, नराधम पित्याविरुद्ध फिर्याद दिली. मुलगी कर्णबधिर आहे. घरात व बाहेरसुद्धा मुली सुरक्षित नसल्याच्या घटना हिंजवडीसह विविध भागांत घडू लागल्या आहेत. शाळेत मुलींना गुड टच आणि बॅड टचची माहिती देत असताना, दोन, पाच आणि सहा वर्षांच्या बालिकांनी त्यांच्यावर ओडावलेला प्रसंग शिक्षिकेपुढे कथन केला. त्यामुळे अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला. पाच आणि सहा वर्षीय दोन बहिणींवर दोन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची पिंपरीत उघडकीस आली.
>बांधकाम मजूर, ऊसतोडणी कामगार यांची ज्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली जाते. त्या ठिकाणी विविध ठिकाणाहून आलेले कामगार एकाच वसाहतीत राहत असतात. त्यांच्यापैकी अनेक जण मजुरीसाठी घराबाहेर पडतात. पती, पत्नी कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असतात. त्या वेळी घरी त्यांच्या लहान मुलांकडे लक्ष देण्यासाठी कोणी नसते. अल्पवयीन मुलींना कोणीही फूस लावते. त्यातून गैरप्रकार घडतात. अशा वस्त्यांमध्ये सुरक्षिततेची दक्षता घेतली गेली पाहिजे. ही सुरक्षिततेची दक्षता घेण्याच्या उपाययोजना शासनाने कराव्यात, अशी अपेक्षा आहे.
- अॅड़ मनीषा महाजन, समुपदेशक
शाळेत ‘गुड टच, बॅड टच’ बाबत माहिती दिली होती. ‘बॅड टच’बाबत समजल्यानंतर पीडित मुलीने तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती शिक्षकांना दिली. त्यानंतर शिक्षिकेने ही माहिती पालकांना दिली. पालकांनी मुलींना विश्वासात घेत विचारपूस केल्यानंतर परिसरात राहणाºया १४ आणि १६ वर्षीय अल्पवयीन मुलांनी फिर्यादी यांच्या पाच आणि सहा वर्षीय बालिकांवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले.
>स्कूल बसचालकाचा अत्याचार
विद्यार्थी वाहतूक करणाºया एका बसचालकाने निगडीतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकारामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने मार्च महिन्यात घडलेली घटना आॅगस्टमध्ये उघडकीस आली. याप्रकरणी बसचालकाविरुद्ध बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.कुटुंबीयांनी विद्यार्थी वाहतूक करणाºया बसचा पर्याय निवडला. स्कूल बसचा प्रवास मुलीसाठी सुरक्षित राहील, असा मुलीच्या कुटुंबीयांचा समज होता.
स्कूल बसमधून नेहमी ये-जा करीत असताना बसचालकाने मुलीशी जवळीक साधली. प्रेमसंबंध निर्माण केले. त्याचा गैरफायदा घेत आरोपीने पीडित मुलीच्या घरी जाऊन तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार नुकताच उघडकीस आला. मुली कोणाच्या सहवासात आहेत, त्या सुरक्षित आहेत का? याची दक्षता घेण्याची जबाबदारी पालकांची आहे. पालकांनी योग्य ती दक्षता घेतल्यास अशा घटनांना आळा बसू शकेल.