गळ्याभोवती जाडसर कपडा गुंडाळणे गरजेचे; पतंगाचा मांजा ठरतोय जीवघेणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 18:58 IST2025-01-15T18:57:52+5:302025-01-15T18:58:10+5:30
मकर संक्रातीनंतर पतंग व मांजा थेट रस्त्यावर येत असल्याने दुचाकीस्वारांचा गळा चिरण्याच्या घटना घडू लागल्या आहेत

गळ्याभोवती जाडसर कपडा गुंडाळणे गरजेचे; पतंगाचा मांजा ठरतोय जीवघेणा
पिंपरी : पतंग उडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात चायनीज नायलॉन मांजाचा वापर होतो. या मांजाचा आकार लहान असल्याने बऱ्याच वेळा तो लांबून डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळे उड्डाणपुलावरून जाताना दुचाकीस्वारांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
मकर संक्रांतीला मोठ्या प्रमाणावर पतंग उडविले जातात. त्यासाठी बंदी असलेल्या मांजाचा अनेकदा वापर होतो. मुळात हा मांजा कठोर असतो. मात्र, एकमेकांचे पतंग कापण्याच्या नादात हवेतच हा मांजा तुटतो. त्यामुळे पतंग मांजासह हवेच्या दिशेने खाली येते. हा पतंग मांजासह झाडावर किंवा इमारतीवर पडतो, रस्त्यावरही येतो. मात्र, रस्त्याच्या कडेला झाडे असल्यास त्या झाडांवर अडकतो. त्यामुळे दुचाकीस्वारांना याचा धोका नसतो. मात्र, पक्ष्यांना मोठा धोका आहे; परंतु उड्डाणपुलाची उंची जास्त असल्यामुळे पतंग व मांजा थेट रस्त्यावर येत असल्याने दुचाकीस्वारांचा गळा चिरण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.
नाशिक फाटा उड्डाणपुलावर झाला होता अपघात
नाशिक फाटा येथे जेआरडी टाटा दुमजली उड्डाणपुलावरून जाताना सावधानता बाळगली पाहिजे. कारण, पतंगाचा मांजा थेट उड्डाणपुलावर येत असतो. ७ ऑक्टोबर २०१८ मध्ये या उड्डाणपुलावर दुचाकीवर जात असताना पतंगाचा मांजा गळ्यात अडकून एका डॉक्टर तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. कृपाली निकम (वय २६) असे मृत डॉक्टर तरुणीचे नाव असून, ती पिंपळे सौदागर या भागात राहत होती. ती पुण्यातून भोसरीकडे जात असताना ही घटना घडली. या घटनेनंतरही प्रशासन ढिम्म असून या जीवघेण्या मांजाची विक्री राजरोसपणे होताना दिसून येते.
असा करा बचाव
दुचाकीवर जाताना धोकादायक मांजापासून आपली काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी गळ्याभोवती जाडसर कपडा गुंडाळणे गरजेचे आहे. या मांजाचा आकार लहान असल्याने लांबून दृष्टीस पडत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांनी प्रवास करताना गळ्याभोवती मफलर, स्कार्प, ओढणी किंवा इतर कोणत्याही प्रकारचे वस्त्र गुंडाळल्यास बचाव होऊ शकतो.