आयटीनगरीचा भार आरोग्य केंद्रावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 11:09 PM2018-10-04T23:09:04+5:302018-10-04T23:09:54+5:30

हिंजवडी, माणला रुग्णसंख्येत वाढ : उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय उभारण्याची मागणी

IT NAGARI depend on health center | आयटीनगरीचा भार आरोग्य केंद्रावर

आयटीनगरीचा भार आरोग्य केंद्रावर

Next

हिंजवडी : माणमधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येणारी हिंजवडी, मारुंजीसहित तब्बल वीस गावांची वाढती लोकसंख्या, तसेच झालेला औद्योगिक विकास पाहता या प्राथमिक केंद्रात येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर ताण येत आहे. त्यामुळे येथील यंत्रणेची अक्षरश: दमछाक होत आहे. या ठिकाणी उपजिल्हा किंवा ग्रामीण रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.

शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत, तसेच जलद आरोग्यसेवा मिळावी यासाठी जिल्हा रुग्णालयानंतर तालुका स्तरावर काही ठरावीक गावे मिळून एक अशी प्राथमिक आरोग्य केद्रांची निर्मिती करण्यात आली. साधारणपणे ३४ वर्षांपूर्वी माणमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. आजच्या तुलनेत त्या वेळची परिस्थिती वेगळी होती. या केंद्राच्या कार्यक्षेत्रात माण, हिंजवडी, मारुंजी, जांबे, नेरे, कासारसाई, नांदे, चांदे, मूलखेड, घोटावडे, रिहे खोरे, आंधळे, कातरखडक, अशी एकूण २२ गावे आहेत. या ठिकाणी असणारा गोरगरीब शेतकरी ते सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी माणमधील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून राहावे लागते. काही गावांमध्ये उपप्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केलेली आहेत; मात्र किरकोळ उपचारानंतर रुग्णांना याच ठिकाणी पाठवले जाते. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील लोकसंख्येत कित्येक पटींनी वाढ झाली असून, उपचार घेण्यासाठी येणाºया रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज किमान २०० ते २५० रुग्ण विविध कारणांस्तव उपचार अथवा तपासणी करण्याकरिता या ठिकाणी येत असतात. अशा परिस्थितीत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असणाºया सुविधा व कर्मचारी वर्ग कमी पडत असून, या ठिकाणी आता मोठ्या दर्जाचे अद्ययावत असे ग्रामीण अथवा उपजिल्हा रुग्णालय असावे, अशी मागणी नागरिक करू लागले आहे. सद्य:स्थितीत माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सहा बेडची सोय आहे. या ठिकाणी १५ कर्मचारी आहेत. एकूण १२ विभाग आहेत. हिमोग्लोबीन, रक्त,
लघवी, लिव्हर फंक्शन, कोलेस्टेरॉल, हिवताप, डेंगी, एड्स अशा
विविध तपासण्या केल्या जातात. शासकीय नियम पाहता एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी या सुविधा पुरेशा आहेत. मात्र बदलती परिस्थिती लक्षात घेता, कित्येक पटींनी वाढलेली लोकसंख्या, झालेला औद्योगिक विकास व या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी येणाºया रुग्णांची संख्या याचा विचार करता माणमध्ये आता प्राथमिक आरोग्य केंद्राऐवजी उपजिल्हा रुग्णालय अथवा ग्रामीण रुग्णालय असणे काळाची गरज आहे. आणि तशी मागणी परिसरातील नागरिकांमधूनसुद्धा होत आहे.

नागरीकरण : स्थानिकांकडून मागणीची गरज

सध्याची वाढलेली रुग्णांची संख्या पाहता या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राऐवजी वरच्या दर्जाचे रुग्णालय असणे गरजेचे आहे. पूर्वीपेक्षा लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. परिसरात औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. वास्तव्यास येणाºयांची संख्या वाढलेली आहे. रुग्णांची संख्यासुद्धा वाढलेली आहे.
- डॉ. बालाजी लकडे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, माण

माणमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राऐवजी ग्रामीण रुग्णालय करण्यास हरकत नाही. मात्र ठरावीक प्रोसेसने मागणी शासनाकडे येणे गरजेचे आहे. यासाठी नागरिकांकडून मागणी होणे गरजेचे आहे. प्रथम ग्रामपंचायतीमध्ये ठराव करून तो पंचायत समितीकडे पाठवावा लागतो. तेथून तो सिव्हिल सर्जनकडे पाठवला जाणे आवश्यक आहे.
- डॉ. दिलीप माने,
जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे

माणमध्ये ग्रामीण रुग्णालय करण्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. पंचायत समितीमध्ये त्या संबंधित अनेक बैठकांमध्ये चर्चासुद्धा झाली आहे. रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता माणमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राऐवजी ग्रामीण रुग्णालयाची गरज आहे. पंचायत समितीकडून तसा पाठपुरावा सुरू आहे.
- पांडुरंग ओझरकर, उपसभापती, पंचायत समिती, मुळशी
 

Web Title: IT NAGARI depend on health center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.