आगीत मेहनतीची झाली राखरांगोळी
By admin | Published: October 12, 2016 01:55 AM2016-10-12T01:55:28+5:302016-10-12T01:55:28+5:30
शहरातील सोसायट्यांमधील कुटुंबाची धुणी-भांडी करून पै -पै जमा केलेली रक्कम, भाड्याची रिक्षा चालवून मिळविलेले पैसे, संसारात काटकसर करून एकत्रित केलेले रक्कम
पिंपरी : शहरातील सोसायट्यांमधील कुटुंबाची धुणी-भांडी करून पै -पै जमा केलेली रक्कम, भाड्याची रिक्षा चालवून मिळविलेले पैसे, संसारात काटकसर करून एकत्रित केलेले रक्कम, शिलाईकाम, वडापावचा गाडा अशी विविध कामे करून संजय गांधी झोपडपट्टीतील नागरिकांनी भिशीसाठी एकत्रित केलेली सुमारे पावणेदोन लाख रुपयांची रक्कम रविवारी लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने वसाहतीतील नागरिकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे़
कुटुंबाच्या भवितव्यासाठी आणि चार पैसे बचत करण्यासाठी संजय गांधीनगरच्या नागरिकांनी भिशी सुरू केली होती़ भिशीची तारीख दर महिन्याच्या १० तारखेला असते़ वेळेत पैसे देण्यासाठी भिशीतील सर्व सदस्यांनी शनिवारीच भिशीचे पैसे भिशीचालक काविराबाई महादेव गायकवाड यांच्याकडे दिले होते़ या भिशीतील एकूण सदस्य संख्या ३५ आहे़ प्रत्येक नंबरला पाच हजार रुपयेप्रमाणे १ लाख ७५ हजारांची रक्कम गायकवाड यांनी एका डब्यात ठेवली होती़ मात्र, रविवारी सकाळी लागलेल्या आगीत सुमारे २१ कुटुंबाच्या झोपड्या जळून खाक झाल्या़ त्या आगीत काविराबाई यांच्या झोपडपट्टीचा समावेश होता़ आगीत संसाराचे सर्व साहित्य तर जळून गेले ़ त्याचबरोबर भिशीचे एकत्रित डब्यात ठेवलेले सुमारे १ लाख ७५ हजारांच्या नोटा अर्ध्या जळाल्या़ डब्यातील शंभर, पाचशे आणि हजाराच्या सर्वच नोटा अर्धवट जळून गेल्याने गायकवाड यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला़ आगीमुळे ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांनी जमा केलेल्या साहित्याची राखरांगोळी झाली़ झोपडपट्टीतील नागरिकांनी दसरा उत्सव आल्यामुळे आणि नवरात्रोत्सव सुरू असल्याने वसाहतीतील अनेक नागरिकांनी कपड्यांची, रेशनची, नवीन वस्तूंची खरेदी केली होती़ परंतु, रविवारच्या भीषण आगीत अवघ्या एका तासाभरात होत्याचं नव्हतं झालं अन् दु:खाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला़
रविवारची रात्र झोपडपट्टीतील नागरिकांनी रस्त्यावर जागून काढली़ आगीत जळालेल्या झोपड्यांतील २१ कुटुंबातील १२४ नागरिकांनी राहायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला आहे़ रविवारी रात्रभर या परिसरात वीज नव्हती़ घाणीचे साम्राज्य, डासांचा प्रादुर्भाव, रात्रीची थंडी अशा अडचणींचा सामना करीत सर्वांनी रात्र जागून काढली़ विशेषत: सोमवारपासून अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्याने शाळेचे सर्व साहित्य आगीत जळाल्याने विद्यार्थी फ क्त अंगावरील कपड्यांसह शाळेत हजर झाले ़ अनेक कुटुंबाचे घरातील जपून ठेवलेले सोने, पैसे , कपडे, संसाराचे साहित्य जळून गेल्याने २१ कुटुंबांनी एकमेकांकडे पाहत दु:ख पचविण्याचा प्रयत्न केला.
... तरीही मोडला नाही कणा; पोरींनो, तुम्ही शाळेत जा
पिंपरी : आगीत सर्वस्व हरपल्यानंतर रविवारची रात्र जागून काढलेल्या कुटुुंबाची दु:खं, यातना कमी होत नव्हती़ संजय गांधीनगरच्या झोपडपट्टीत लागलेल्या आगीत सुमारे २१ कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले़ त्यापैकी एक मुकेश कांबळे यांचे घर आहे़ त्यांनी विक्रीसाठी घेतलेला वीस हजार रुपयांचा कपड्यांचा माल जळाल्याने मोठा परिवार आगीमुळे पूर्णत: खचला आहे़ मात्र, दु:खातही सहा मुली आणि एक मुलगा यांच्याकडे पाहत पोरींनो, तुम्ही शाळेत जा. आम्ही बघतो काय करायचं ते, असे सोमवारच्या सकाळी मुलींना शाळेत पाठविण्यासाठी प्रेरणादायी उद्गार होते मुलींच्या आईचे़
मुकेश आणि संजनाचा परिवार गेल्या अनेक वर्षांपासून या झोपडपट्टीत राहायला आहे़ मुकेश हे रिक्षाचालक आहेत़ तर पत्नी साड्या विकण्याचा व्यवसाय करते़ दसऱ्याचा सण जवळ आल्याने झोपडपट्टीतील महिलांना साड्या विकण्यासाठी मुकेश यांनी रिक्षा चालवून एकत्रित केलेल्या पैशांतून सुमारे वीस हजार रुपयांची साड्यांची खरेदी केली़ रविवारच्या आगीत या साड्या, संसाराचे साहित्य, मुलांचे शालेय साहित्य, बचत केलेली रक्कम खाक झाली़ त्यांची ऋतिका ही मुलगी ११वीत शिकते़ तर स्नेहा नववीच्या वर्गात आहे़ साक्षी आठवी, वैष्णवी आणि पायल सातवी, मुलगा पाचवी, तर दोन वर्षांची चिमुरडी आहे़
आगीत मुलींच्या शाळेचे सर्व साहित्य जळून गेल्याने, हतबल झालेल्या मुलींकडे पाहून पोरींनो, तुम्ही शाळेत जा. काय करायचं, ते आम्ही बघतो, हे उद्गार त्यांची आई संजना यांनी सकाळी मुलींना शाळेत पाठविण्यासाठी काढले़ सर्व काही जळाल्यामुळे त्यांच्या मुली फ क्त अंगावरील कपड्यांसह शाळेत गेल्या़