आम्ही पॉझिटिव्ह झालो तरी चालेल; पण महापालिकेच्या सभागृहात येणारच ; पिंपरीत विरोधी पक्ष आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 02:05 PM2021-05-21T14:05:31+5:302021-05-21T14:06:43+5:30
आम्ही पॉझिटिव्ह झालो. तरी, चालेल सभागृहात येणार; पिंपरीत विरोधक आक्रमक...
पिंपरी : महापालिका सभेत सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी धारेवर धरले. आम्ही पॉझिटीव्ह झालो. तरी, चालेल पण सभागृहात येणार आहोत. यापुढे ऑनलाईन सभा चालू देणार नाही, असा इशाराही विरोधकांनी दिला.
महापालिका सभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. सभागृहातून सभा होत असतानाही कोणत्या उपसूचना दिल्या जातात हे कळत नव्हते. लक्षात येवू दिले जात नाही. तर, आॅनलाईन सभेच्या माध्यमातून काही घोटाळे केले जातील हे आम्हाला कळणार नाही. आम्हाला जनतेने निवडून दिले आहे. त्यांचे प्रश्न सभागृहात मांडणे आमचे कर्तव्य आहे, अशा भावना व्यक्त केल्या.
विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले, ‘‘कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. त्यामुळे ही सभा सभागृहात मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित घेतली असती तरी चालले असते. माहे एप्रिल महिन्याची विशेष सभा दिनांक ३० एप्रिल रोजी घेतली तेव्हा कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती. तेव्हा मात्र, ही सभा सभागृहात सभा घेतली. यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये घेण्यात यावी. म्हणजे सर्वांना या सभेत भाग घेऊन आपली मते मांडता येतील.’’
भाजपच्या आशा शेंडगे म्हणाल्या, ‘‘आॅनलाईन सभेमुळे असंख्य अडचणी येत आहे. काही समजत नाही. त्यामध्ये तांत्रिक त्रुटी आहेत. त्या दूर करणे आवश्यक आहे.’’
शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, ‘‘आॅनलाईन सभेत कोण काय बोलतय हे कळत नव्हते. आवाजही व्यवस्थित येत नव्हता. याबाबत तांत्रिक अडचणी दूर करायला हवेत.’’
मनसे गटनेते सचिन चिखले म्हणाले, ‘‘ऑनलाईन सभेत अनेक अडथळे आले. विषय समजत नव्हते. तसेच महापौर काय बोलताहेत हे आमच्यापर्यंत पोहोचत नव्हते. त्यामुळे ऑनलाईन सभेतील त्रुटी दूर कराव्यात.’’