'जीव गेला तरी चालेल पण...' ८०० मीटर फरफटत जाऊनही पोलिसाने थांबवली गाडी
By रोशन मोरे | Published: August 28, 2022 05:41 PM2022-08-28T17:41:03+5:302022-08-28T17:41:13+5:30
जीवाची पर्वा न करता नियमभंग करणारी गाडी थांबवणाऱ्या वाहतूक शाखेतील बहाद्दर पोलिसाचे नाव देवराम पारधी
पिंपरी : वेळ शुक्रवारी सायंकाळी ५.३० ची. ठिकाणी निगडीतील खंडोबामाळ चौक. वाहनांची वर्दळ आणि भर रस्त्यावर विनानंबर कारच्या बोनेटला लटकलेला वाहतूक पोलीस. अपघात घडून काहीही होईल, अशी मनाची थरकाप उडवणारी स्थिती. मात्र, जीवाची परवा न करता तो बहाद्दर पोलीस गाडी थांबवायचीच या उद्देशाने कारच्या बोनेटला लटकून राहला. शेवटी ८०० मीटर फरफटत गेल्यानंतर ती गाडी थांबली. जीवाची पर्वा न करता नियमभंग करणारी गाडी थांबवणाऱ्या वाहतूक शाखेतील बहाद्दर पोलिसाचे नाव देवराम पारधी.
पोलीस नाईक देवराम हे वाहतूक शाखेत मागील दोन वर्षांपासून कार्यरत आहेत. नेहमी प्रमाणे शुक्रवारी निगडीतील खंडोबामाळ चौकात वाहतूक नियमन करून आपले कर्तव्य बजावत होते. त्यावेळी विनानंबरची आणि काळ्या काचा असलेली एक स्वीफ्टकार त्यांना थरमॅक्स चौकातून त्यांच्या दिशेने येताना दिसली. त्यांनी हात करून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडीचालकाने गाडी वेगाने नेण्यात प्रयत्न केला. मात्र पुढे असलेल्या इतर वाहनांमुळे त्याला कार थांबवी लागली. देवराम यांनी कारचालकाकडे गाडीचे कागदपत्रांची मागणी केली. मात्र, आपल्याकडे कागदपत्रे नाहीत, अशी कबूली कार चालकाने दिली. त्यावेळी कारच्या समोर असलेली इतर वाहने गेली होती. त्यामुळे गाडी बाजुला घेतो असे म्हणत कार पळवण्याचा प्रयत्न कारचालकाने केला. मात्र, देवराम यांनी वेगाने गाडीच्या बोनेटवर आडवे होत दोन्ही हातांनी बोनटले पकडले. याच स्थिती आरोपीने त्यांना फरपट नेले.
काही झाले तरी आरोपीला सोडायचे नाही या इराद्याने देवराम गाडीला लटकले. गाडी वेगाने जात होती. देवराम गाडीवर लटकून कारचालकाला गाडी थांबण्यासाठी सांगत होते. काही झाले तरी नियमभंग करणाऱ्याला सोडायचे नाही, हाच विचार त्यांच्या मनात होता. वायफरला पकडून काच तोडण्याचे ही त्यांच्या मनात एक क्षण आले. मात्र, कारचालकाने गाडीचा वेग आणखीच वाढवला. ८०० मीटरपर्यंत फरपट गेल्यानंतर पुढे इतर वाहनांची गर्दी आणि त्याचवेळी पेट्रोलींग करणारे गार्ड मागून आले आणि कारचालक शेवटी थांबला.
आधी कर्तव्य मग उपचार
गाडी थांबल्यानंतर देवराम यांनी ती कार चालवत पोलीस स्टेशनला नेली. कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी भरत तुकाराम जैद (वय २८, रा.चिंबळी फाटा, खेड) याला ताब्यात घेतले. त्यानंतर देवराम उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात गेले. त्यांच्या हाताला मुका मार लागला असल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली.
''गाडीच्या बोनेवट लटकत असताना माझ्या खिश्यात मोबाईल आणि चलन करण्याची मशीन होती. मशीनचे नुकसान होऊ नये, असेच मला वाटत होते. बोनेटला लटकत असताना काही झाले तरी आरोपीला सोडायचे नाही, हाच विचार माझ्या मनात होता. - देवराम पारधी, पोलीस नाईक, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड''