१९४७ च्या लढ्यातूनच स्वातंत्र्य मिळाले म्हणणे चुकीचे : सुमित्रा महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 09:01 PM2018-07-08T21:01:10+5:302018-07-08T21:03:07+5:30
चिंचवड मधील क्रांतिवीर चापेकर वाड्यात क्रांतीवीर चापेकर बंधूच्या टपाल तिकीट अनावरण सोहळयात त्या बोलत होत्या.
पिंपरी : देशाला स्वांतत्र्य मिळाले याचे श्रेय अनेक गोष्टींना आहे. फक्त १९४७ च्याच स्वातंत्र्य लढ्यातून स्वातंत्र्य मिळाले असे म्हणने चुकीचे ठरेल. स्वातंत्र्यासाठी १८५७ ते १९४७ हा शंभर वर्षांचा कालखंड महत्वाचा आहे. १८५७ च्या स्वातंत्र्य समरापासून ते महात्मा गांधींचा लढा इथपर्यंतच्या एकत्रित पणे दिलेल्या लढ्याचा परिपाक स्वातंत्र्य आहे, असे मत लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केले.
चिंचवड मधील क्रांतिवीर चापेकर वाड्यात क्रांतीवीर चापेकर बंधूच्या टपाल तिकीट अनावरण सोहळयात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राज्यसभेचे खासदार अमर साबळे, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, महाराष्ट्र व गोवा राज्याचे मुख्य पोस्टमास्तर हरिश अगरवाल, चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह सतीश गोरडे, सह कार्यवाह रवी नामदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मिलिंद देशपांडे आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्य समराविषयी बोलताना महाजन म्हणाल्या, ‘‘चापेकरबंधूप्रमाणेच प्राणापर्ण करणाऱ्या क्रांतिकारकांमुळे देशभक्तांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. स्वातंत्र्यासाठी १८५७ ते १९४७ हा शंभर वर्षांचा कालखंड महत्वाचा आहे. केवळ १९४७ च्या लढ्यामुळे स्वातंत्र्य मिळाले असे म्हणने चुकीचे ठरेल. स्वातंत्र्यासाठी अनेक देशभक्तांनी दिलेली प्राणांची आहुती दिली. चले जाव दिलेला नारा दिला आणि इंग्रज गेले असेही नाही. स्वातंत्र्यासाठी अनेकांच्या प्राणाच्या आहुतीची किंमत देशाला चुकवावी लागली. मात्र, स्वातंत्र्याबद्दल एकच गाणे वाजविले जात आहे. स्वातंत्र्यांचा विचार घेऊन महात्मा गांधीजींनी आणि घराघरात जागृती निर्माण केली. सामान्यांमध्ये आत्मविश्वास भरला. शंभर वर्षांच्या एकत्रीत प्रयत्नातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातत्र्य चळवळीत पुण्याचेही मोठे योगदान होते. चापेकर यांच्या नावाने टपाल तिकीट सुरु होणे ही केवळ उत्सवाची बाब नाही. तर टपाल तिकिटाच्या माध्यमातून त्यांना वाहिलेली खरी आदरांजली आहे. त्यांचा इतिहास यानिमित्ताने संपूर्ण देशभरात वारंवार पोहोचणार आहे. ’’