आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळाली रोजगाराची संधी; कुशल मनुष्यबळाला कंपन्यांकडून मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 07:24 AM2020-08-01T07:24:35+5:302020-08-01T07:25:07+5:30
लॉकडाऊनमध्ये दिलासा! २५ कंपन्यांनी मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, म्हणून आयटीआयकडे विचारणा केली आहे.
नारायण बडगुजर
पिंपरी : लॉकडाऊनच्या काळात हजारो हात बेरोजगार झाले. त्यामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, आयटीआयवाल्यांना लॉकडाऊनमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. उद्योगनगरीतील २५ कंपन्यांनी मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, म्हणून महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडे (आयटीआय) विचारणा केली आहे. त्यानुसार संबंधित कंपन्यांना दोन हजार प्रशिक्षित कामगारांबाबत आयटीआयकडून माहिती देण्यात आली असून, त्यातील शेकडो विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोरवाडी व कासारवाडी येथे आयटीआय आहे. या दोन्ही आयटीआयच्या माध्यमातून २० व्यवसायांचे (ट्रेड) अभ्यासक्रम व प्रशिक्षण दिले जाते. यातील नऊ ट्रेड एक वर्षाचे तर उर्वरित ११ ट्रेडचा कालावधी दोन वर्षांचा आहे. मोरवाडीतील आयटीआयमध्ये १४ ट्रेड असून त्यासाठी ७८४ तर कासारवाडी येथील महिला आयटीआयमध्ये सहा ट्रेड असून ११० प्रशिक्षणार्थ्यांना अशा ८९४ जणांना दरवर्षी प्रवेश दिला जातो. यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शहर व परिसरातील औद्योगिक आस्थापनांमध्ये संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थी-शिक्षकांचे व्हॉटसअप ग्रुप आहेत. कोणत्या कंपनीत पदभरती आहे, त्यांचे वेतन, सुविधा कोणत्या ट्रेडसाठी संधी आहेत याबाबत माहिती या ग्रुपवरून दिली जाते. त्यामुळे संबंधित प्रशिक्षणार्थी कंपनीकडे संपर्क साधतात.
कंपन्यांच्या मनुष्यबळ विकास विभागाचे प्रतिनिधी आयटीआयकडे संपर्क साधतात. त्यांच्या आवश्यकतेनुसार कुशल मनुष्यबळाची माहिती आयटीआयकडून त्यांना दिली जाते. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्याचे नाव, त्याचा ट्रेड, संपर्क क्रमांक आदी माहिती उपलब्ध करून देण्यात येते. त्यानंतर संबंधित कंपनीकडून थेट प्रशिक्षणार्थ्याशु संपर्क साधला जातो. त्यानंतर पदभरतीची प्रक्रिया सुरू केली जाते.
परप्रांतीय मजूर गावी गेल्याचा परिणाम
कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड, तळेगाव, टाकवे, चाकण, हिंजवडी-माण आदी एमआयडीसी परिसरातील लाखो परप्रांतीय कामगार त्यांच्या मूळ गावी परतले. दरम्यान लॉकडाऊन शिथिल होऊन औद्योगिक आस्थापना पुन्हा सुरु झाल्या. मात्र, कुशल मनुष्यबळ नसल्याने त्यांना फटका बसला आहे.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काही आस्थापनांनी पदभरतीची माहिती देऊन मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, म्हणून आयटीआयकडे विचारणा केली. यात सूक्ष्म, लघू उद्योग तसेच राष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. या माध्यमातून प्रशिक्षणार्थीना रोजगार संधी मिळत आहेत.
- शशिकांत पाटील, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी