विजयापेक्षा लढत महत्त्वाची
By admin | Published: February 15, 2017 01:59 AM2017-02-15T01:59:13+5:302017-02-15T01:59:13+5:30
धाडसी खेळांमधील तळेगावातील मुलींची चमकदार कामगिरी उद्याच्या विजयाची नांदी देणारी आहे. लढत देणे हे महत्त्वाचे आहे.
तळेगाव दाभाडे : धाडसी खेळांमधील तळेगावातील मुलींची चमकदार कामगिरी उद्याच्या विजयाची नांदी देणारी आहे. लढत देणे हे महत्त्वाचे आहे. विजयी होणे हा सोपस्कार आहे. म्हणूनच आॅलिम्पिकचे ब्रीद स्पर्धेत विजयी होणे महत्त्वाचे नाही तर सहभागी होणे जास्त महत्त्वाचे आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी येथे व्यक्त
केले.
नुकत्याच झालेल्या शालेय राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत येथील गणेश काकडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या ऋतुजा सुर्वे हिने सुवर्णपदक पटकाविले. त्यानिमित्त आयोजित सत्कार समारंभात काकडे बोलत होते. ऋतुजाचे यश हे अभिमानास्पद आहे. परंतु ज्यांना विजयी होता आले नाही त्यांनी खचून जाण्याचे कारण नाही, असे सांगून काकडे म्हणाले, आयुष्यात अनेक संधी येत असतात. त्यात यशापयशही येते. यशाने जे हुरळून जात नाहीत आणि अपयशाने खचून जात नाहीत तेच खरे खिलाडूवृत्तीचे असतात. जनमाणसात अशांना आदराचे स्थान कायम असते. ऋतुजाने तळेगावची शान राखली आहे.
या वेळी क्रीडा प्रशिक्षक सुभाष दाभाडे यांनाही सन्मानित करण्यात आले. या वेळी पालक खेळाडू, फाउंडेशनचे सदस्य आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला विद्यार्थ्यांबरोबर पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी विजेत्यांचे कौतुक केले. (वार्ताहर)