सोने उजाळून देणे नसते, ती हातसफाई असते! सावध राहा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 01:00 PM2022-08-26T13:00:39+5:302022-08-26T13:05:01+5:30
‘दागिना’ प्रत्येक महिलेचा जिव्हाळ्याचा विषय...
-नारायण बडगुजर
पुणे : दारावर एक व्यक्ती आला...बाई दागिने असतील तर द्या. इथंच लगेच तुमच्यासमोर सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो. घरात बाई एकटीच. ती माणसाच्या भूलथापांना बळी पडली आणि ती आत दागिने आणायला गेली. तेवढ्यात त्यांचा मुलगा आला अन् त्याने आईला दागिने देण्यास अडवले. त्यामुळे अनर्थ टळला...अन्यथा सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ व्हायला वेळ लागला नसता. ही एक नुकतीच घडलेली घटना, पण चोरटे ‘सोने उजळून द्यायला नव्हे, तर सोने साफ करायला आलेले असतात... त्यामुळे दागिन्यांना उजाळण्यासाठी आलेल्या चोरट्यांबाबत सावध राहा!
‘दागिना’ प्रत्येक महिलेचा जिव्हाळ्याचा विषय. दागिने परिधान करणे आणि ते सातत्याने चकाकत ठेवणे याचा महिलांना जणू छंदच असतो. याचाच गैरफायदा चोरट्यांकडून घेतला जातो आणि दारावर आलेल्या माणसाच्या हातात हजारो आणि लाखो रुपयांचे दागिने दिले जातात. सोने साफ करण्याच्या बहाण्याने हात सफाई केली जाते. यातून फसवणूक होण्याचे प्रकार घडतात. शहरी भागातील कमी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या घरांचा हे चोरटे शोध घेतात. अशा घरांमध्ये दुपारी पुरुष मंडळी किंवा परिसरात कोणी नसताना महिलांना सोने साफ करून देण्याचे सांगतात. त्यामुळे महिलांनी सावध राहणे आवश्यक आहे. दागिने उजाळण्यासाठी आलेल्या चोरट्यांबाबत पोलिसांना त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
भूलथापांना बळी पडू नका
फसवणूक करण्यासाठी आलेले चोरटे चतुराईने बोलतात. त्यामुळे महिलांचा त्यांच्यावर सहज विश्वास बसतो. त्यांच्याकडील धातूला चकाकी देण्याचे सांगत पाण्यात किंवा केमिकलमध्ये धातू बुडवून चकाकी आल्याचे दाखवितात. तुमच्याही दागिन्यांना अशीच चकाकी आणून देतो, असे सांगितले जाते. मात्र, अशा भूलथापांना बळी पडू नका.
दागिन्यांना चकाकी राहिली नाही. त्यामुळे ते उजाळून देतो असे सांगत असेल तरी त्यांच्या हातात सोन्याचे दागिने देताना आधी विचार करा. दुकानात जाऊनच कारागिरांसमोर सोन्याला चकाकी करून घेणे अधिक योग्य आहे. खात्रीशीर सराफा व्यावसायिकाकडूनच सोने उजाळून घ्यायला हवे.
- अभय गाडगीळ, पीएनजी १८३२, नळस्टॉप