Pimpri Chinchwad: रामाच्या पारी आली उमेदवार प्रचाराची बारी! निवडणुकीने दिला लोककलावंतांना रोजगार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 04:14 PM2024-11-10T16:14:29+5:302024-11-10T16:14:57+5:30
विधानसभेची रणधुमाळी रंगात येऊ लागल्याने शाहीर कला पथक, गोंधळी, वासुदेव असे विविध लोककलावंत प्रचारात उतरले
विश्वास मोरे
पिंपरी : 'दान पावलं, दान पावलं...' म्हणत सुख आणि सौख्याचं दान मागणारा पारंपरिक वेशातील वासुदेव आता विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसाठी मतदानाचे दान मागत आहे. ‘रामाच्या पारी आली उमेदवार प्रचाराची बारी!’ असे चित्र दिसत आहे. ‘आला आला हो वासुदेव..’ असे म्हणत संतोष कानडे, नितीन सुरवसे, बबलू घोडके, दत्ता कानडे हे कलावंतकला सादर करीत आहेत. विधानसभा निवडणुकीने लोककलावंतांना रोजगार मिळवून दिला आहे.
विधानसभेची रणधुमाळी रंगात येऊ लागली आहे. शाहीर कला पथक, गोंधळी, वासुदेव असे विविध लोककलावंत प्रचारात उतरले आहेत. पिंपरी-चिंचवड आणि भोसरी या तीनही मतदारसंघांमध्ये विविध राजकीय पक्ष उमेदवारांनी लोककलावंतांच्या साह्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. विविध लोककलावंत मतदान जागृतीबरोबरच उमेदवारांची माहिती, केलेलं काम, राजकीय पक्षांनी केलेलं काम पोहोचवत आहे.
उस्मानाबाद, सांगलीहून आले कलावंत
महाराष्ट्रातील विविध भागांतील कलावंत पिंपरी-चिंचवडमध्ये मतदान जागृती आणि उमेदवारांच्या प्रचारासाठी दाखल झालेले आहेत. लोककलांच्या माध्यमातून प्रबोधन आणि जागृतीचे काम करत आहे. मराठवाड्यातील विविध भागातून वासुदेव, गोंधळी, शाहीर, संबळ वादक, हलगी वादक, दिमडी वादक आलेले आहेत. त्यामुळे आता 'रामाच्या पारी आली वासुदेवाची स्वारी...' असा आवाज आता स्मार्ट सिटीमध्ये घुमू लागला आहे. उमेदवारांना निवडून देण्याचे दान मागत आहे. सकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये वासुदेव, गोंधळी आपली कला सादर करत आहेत. त्याचबरोबर काही कलापथके दिवसात चार ते पाच कार्यक्रम सादर करत आहेत.
शहरांमध्ये दहा ते बारा कलापथके कला सादर करत आहेत. जागृती करण्याबरोबरच उमेदवारांची, तसेच राजकीय पक्षांची माहितीही विविध गीतांमधून सादर केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने अनेक कलावंतांना शहरांमध्ये कला सादर करण्यासाठी निमंत्रित केले आहे.
निवडणुकीच्या निमित्ताने लोककलावंतांना शाहिरांना रोजगार मिळाला आहे. ही चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर त्यांना कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. - प्रकाश ढवळे, शाहीर
कलावंत हे प्रबोधनाचे काम करत असतात आणि शहरांमध्ये चार ते पाच कलापथके येऊन कला सादर करत आहेत, त्यामध्ये लोककलावंतांचा समावेश अधिक आहे. मराठवाड्याच्या विविध भागांतून हे कलावंत आलेले आहेत. -आसाराम कसबे (प्रसिद्ध लोककलावंत)
मी मूळचा सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील आसंगी गावचा. गेल्या ३० वर्षांपासून कलापथकाच्या माध्यमातून शाहिरी सादर करत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा विविध भागांमध्ये कला सादर केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ११ नोव्हेंबरपासून विविध भागांमध्ये प्रबोधनाचे काम करणार आहे. यामधून अनेक कलावंतांना रोजगार उपलब्ध झाला आहे. -सुरेश सूर्यवंशी (शाहीर, सांगली)
आम्ही मराठवाड्यातून आलो आहोत. शहरातील विविध भागांमध्ये मतदान जागृती आणि उमेदवारांची माहिती लोककलेच्या माध्यमातून मतदारांना व्हावी यासाठी प्रयत्न करत आहोत, त्यातून आम्हाला रोजगार मिळाला आहे. - संतोष कानडे, वासुदेव, उस्मानाबाद