विनोदी नाट्यातून अहिराणीचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:45 AM2018-08-13T01:45:15+5:302018-08-13T01:45:30+5:30
पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळूभाऊ फुले नाट्यमंदिरात झालेल्या अहिराणी शब्दबंधन आयोजित ‘जागर अहिराणीचा’ या कार्यक्रमात प्रेक्षकांनी अहिराणी भाषेचा आस्वाद घेत मोठ्या संख्येने प्रेक्षागृहात रसिकांनी हजेरी लावली.
सांगवी : पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळूभाऊ फुले नाट्यमंदिरात झालेल्या अहिराणी शब्दबंधन आयोजित ‘जागर अहिराणीचा’ या कार्यक्रमात प्रेक्षकांनी अहिराणी भाषेचा आस्वाद घेत मोठ्या संख्येने प्रेक्षागृहात रसिकांनी हजेरी लावली. दीपप्रज्वलन करून खान्देशची कुलदैवत गौराईचे पूजन करण्यात आले.
नगरसेविका माई ढोरे, शारदा सोनवणे, नगरसेवक नामदेव ढाके, मच्छिन्द्र ढोरे, हिरेन सोनवणे आदी या वेळी उपस्थित होते. मंत्रालयात प्राणत्याग केलेले खान्देशचे आजोबा धर्मा पाटील व शहीद जवानांना या वेळी श्रद्धांजली वाहिली.
अहिराणी भाषेतील खान्देश रत्नांच्या मुलाखतीतून खान्देशातील प्रमुख प्रश्नांना या वेळेस उजाळा देण्यात आला. दिवंगत भाऊसाहेब हिरे यांच्या स्वप्नातली खान्देशी नारपार दमणगंगा योजना जर पूर्णपणे अस्तित्वात आली, तर उत्तर महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् झाला असता, असे मत प्रवक्ता सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. अहिराणी भाषा संशोधक बापूसाहेब हटकर म्हणाले, ‘‘अहिराणी भाषा दोन हजार वर्षांपूर्वीची आहे. पण या भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला नाही. म्हणून ती दुर्लक्षित राहिली. त्यामुळे या भाषेला प्रमाणभाषेचा दर्जा मिळविण्यासाठी आंदोलने करावे लागतील.’’
खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या परिसरातून रोजगार व नोकरीच्या शोधात व पुण्यात स्थायिक झालेल्या उद्योजकांची यशोगाथा उलगडत मुलाखतकार जितेंद्र चौधरी यांनी उद्योजकांना बोलते केले. महेंद्र पाटील, दीपक पाटील, पंकज निकम, पी. टी. चौधरी, जगदीश पाटील, पीतांबर लोहार, देवयानी पाटील, योगेश कुलकर्णी, प्रस्तुतकर्ता पारस बाविस्कर, ससून रुग्णालयाचे डॉक्टर आर. टी. बोरसे यांनी या मुलाखतीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. हिंदी व मराठीतून लवकरच प्रदर्शित होत असलेल्या ‘मोल’ चित्रपटाचे प्रमोशन या वेळी करण्यात आले.
विनोदी अहिराणी कलाकार प्रवीण माळी यांचा ‘आयतं पोयतं सख्यांन’ याच्या १८९ व्या प्रयोगाचे सादरीकरण झाले. अहिराणी शब्दबंधनचे कार्यकर्ते शशिकांत पाटील, खुशाल पाटील, हितेंद्र बडगुजर, संजय क्षीरसागर, दीपक वारुडे, कैलास पाटील, समाधान पाटील, राजू पाटील आदींनी परिश्रम घेतले. मुलाखतकार जितेंद्र चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.