जांबेत गायकवाड बिनविरोध
By Admin | Published: August 24, 2015 02:59 AM2015-08-24T02:59:15+5:302015-08-24T02:59:15+5:30
जांबे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अंकुश गायकवाड यांची, तर उपसरपंचपदी ऋषिकेश गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. निवड होताच फटाक्यांची आतषबाजी
वाकड : जांबे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अंकुश गायकवाड यांची, तर उपसरपंचपदी ऋषिकेश गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. निवड होताच फटाक्यांची आतषबाजी आणि गुलाल उधळीत आनंदोत्सव साजरा झाला.
निवडीची घोषणा होताच नवनिर्वाचित सरपंच-उपसरपंचांनी सदस्यांसह ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेतले. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या स्वाती हुलावळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुकाध्यक्ष शंकर मांडेकर, विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील चांदेरे, मोरेश्वर भोंडवे, नवनाथ लोखंडे आदी उपस्थित होते.
सकाळी अकराच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी केवळ एकेक अर्ज दाखल झाल्याने छाननी करून तो वैध असल्याने एकच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी काकासाहेब शिक्केतोड यांनी अंकुश गायकवाड यांच्या नावाची सरपंच, तर ऋषिकेश गायकवाड यांच्या नावाची उपसरपंच म्हणून घोषणा केली. त्यांना सहायक म्हणून ग्रामसेवक सतीश कालेकर आणि तलाठी संजीव साळवी यांनी काम पाहिले.
भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळवीत एकूण ९ पैकी ८ जागांवर दणदणीत विजय संपादित केला होता. सलग दोन पंचवार्षिक या पदासाठी होणारी निवड बिनविरोध करण्याची परंपरा गावाने यंदाही कायम ठेवली आहे. सर्वांना समान संधी मिळावी यासाठी अंकुश गायकवाड यांची नियुक्ती ३ वर्षांकरिता, तर ऋषिकेश गायकवाड यांची १० महिन्यांकरिता ही निवड झाली. (वार्ताहर)