जनाईचे पाणी पोहोचले खोरला
By Admin | Published: May 4, 2015 02:55 AM2015-05-04T02:55:19+5:302015-05-04T02:55:19+5:30
परिसरातील पद्मावती तलावात जनाई उपसा सिंचन योजनेच्या वितरिका टप्पा क्र. ३ मधून रविवारी पाणी सोडण्यात आले आहे.
खोर : परिसरातील पद्मावती तलावात जनाई उपसा सिंचन योजनेच्या वितरिका टप्पा क्र. ३ मधून रविवारी पाणी सोडण्यात आले आहे.
जनाई उपसा सिंचन योजनेच्या पुरंदर शाखेच्या सिंचन योजनेवरती २ हजार ८५0 हेक्टर क्षेत्र सध्या अवलंबून आहे. त्यापैकी बारामती तालुक्यामधील ८५0 हेक्टर, तर पुरंदर तालुक्यामधील २ हजार हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. बारामती तालुक्यामधील वढाणे, बोरकरवाडी, आंबी ही गावे सिंचन योजनेच्या क्षेत्रामध्ये येत असून, पुरंदर तालुक्यामधील रिसे, पिसे, खोपडेवाडी, राजुरी, राघु भगतवाडी, खोसेवाडी, नायगाव, पांडेश्वर ही गावे या सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये येत आहे. मात्र, दौंड तालुक्याच्या उशाशी ही सिंचन योजना कार्यान्वित असूनदेखील या योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये दौंड तालुक्यामधील एकही गाव घेण्यात आलेले नाही.
लोकवर्गणीच्या माध्यमातून खोर परिसरामधील असलेल्या हरिबाचीवाडी येथील पद्मावती तलावात ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामधून व आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांमधून पाणी सोडण्यात आले असल्याचे ग्रामस्थ नाना चौधरी यांनी सांगितले आहे.
दौंड तालुक्यामधील गावांचा लाभक्षेत्रामध्ये सामाविष्ट नसल्याने पाणी आणण्यामध्ये शेतकऱ्यांना मोठी अडचण येत आहे.
लोकवर्गणीच्या माध्यामातून पाणी घेऊन शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनी उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये पिकांकरिता टिकून ठेवण्याची वेळ येत आहे. खोरच्या पद्मावती तलावात जनाईच्या
वितरिका क्र. ३ मधून पाणी
सोडण्यात आले. या वेळी नाना
चौधरी, बाळासाहेब चौधरी, तात्या चौधरी, रामभाऊ कोलते, दत्तात्रय चौधरी, श्रीरंग चौधरी, महादेव चौधरी, संतोष चौधरी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
या आधीदेखील गेल्या काही महिन्यांपूर्वी आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्यामधून पाणी सोडण्यात आले होते. पद्मावती तलाव ते वितरिका क्र. ३ हे अंतर दीड किलोमीटर असून, शेतकऱ्यांनी पाइपलाइनच्या साहाय्याने तसेच पाट करून हे पाणी घेतलेले आहे. पद्मावती तलावाबरोबरच फडतरेवस्ती तलावातदेखील वितरिकेचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी डोंबेवाडी ग्रामस्थांनी केली आहे. जनाई योजनेचे पाणी शेतीला लाभदायक व स्वच्छ असून, सध्या हे पाणी शेतीबरोबरच वन्यप्राण्यांना देखील लाभदायक ठरत आहे.