जयंती महोत्सवात प्रबोधनावर भर हवा
By admin | Published: March 28, 2017 02:26 AM2017-03-28T02:26:49+5:302017-03-28T02:26:49+5:30
महापालिका आयोजित करीत असलेल्या जयंती महोत्सवात महामानवांच्या जीवनकार्याशी सुसंगत अशा प्रबोधनपर
पिंपरी : महापालिका आयोजित करीत असलेल्या जयंती महोत्सवात महामानवांच्या जीवनकार्याशी सुसंगत अशा प्रबोधनपर कार्यक्रमावर भर द्यावा, अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी महापौर नितीन काळजे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याही वर्षी महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. दि. ११ ते १४ एप्रिल असा म्हणजे राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले जयंती ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असा संपन्न होत असतो. या निमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यात मनोरंजनावर अधिक भर असतो. ‘विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शुद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले’ असा संदेश देणारे महात्मा फुले आणि ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असा संदेश देणारे बाबासाहेब यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करीत असताना या दोन्ही महामानवांच्या या संदेशाकडे दुर्लक्ष होता कामा नये, असे वाटते. या महामानवांनी आपल्या जीवनकाळात सामाजिक समानतेचा घेतलेला ध्यास, स्त्री-पुरुष समानतेसाठी केलेले कार्य, शिक्षण प्रसाराची धरलेली कास, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व धार्मिक विषमतेविरुद्ध केलेला संघर्ष या सर्वांचा प्रभावी व परिणामकारक प्रसार होईल, असे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. (प्रतिनिधी)
सामाजिक प्रबोधनाच्या, विषमता निर्मूलनाच्या क्षेत्रात, तसेच सामाजिक क्षेत्रात प्रभावी व नि:स्वार्थपणे कार्य करीत असलेल्या शहरातील कार्यकर्त्यास डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे. या दोन्ही महामानवांच्या नावाने मागासवर्गीय विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती सुरू करण्यात यावी. समाजातील गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात किमान एक अद्ययावत अभ्यासिका सुरू करण्यात यावी. प्रतिकूल परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करणे त्यांना बऱ्याचदा अशक्य होते. अशा विद्यार्थ्यांसाठी अर्थसाहाय्य योजना सुरू करण्यात यावी.