Pimpri Chinchwad: शहरातील बस थांब्यांवर दागिने चोरणारे जेरबंद; पोलिसांची कारवाई, सोने जप्त
By नारायण बडगुजर | Published: March 18, 2024 11:10 AM2024-03-18T11:10:31+5:302024-03-18T11:11:10+5:30
भोसरी पोलिसांनी चोरीच्या घटना घडलेल्या ठिकाणांना भेटी देत सीसीटीव्ही फुटेज तपासले...
पिंपरी : बस थांब्यावरील गर्दीत प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून चार लाख २२ हजार रुपये किमतीचे ७२ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. भोसरी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने ही कारवाई केली. मोहन जाधव (३२, रा. मुंढवा, पुणे. मूळ रा. अंबरनाथ, मुंबई), शिवराज वाडेकर (२५, रा. मुंढवा, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
भोसरी पोलिसांनी चोरीच्या घटना घडलेल्या ठिकाणांना भेटी देत सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथके तयारी केली. त्यात भोसरी पोलिस ठाण्यातील एक पथक भोसरीतील पीएमटी चौकात गस्त घालत असताना त्यांना दोन संशयित व्यक्ती दिसले. त्यांची चौकशी केली असता दोघांनी नाशिक फाटा बस थांबा, भोसरीतील पीएमटी बस थांबा येथून प्रवाशांचे दागिने चोरल्याचे सांगितले. त्यांच्याकडून चार लाख २२ हजार रुपये किमतीचे ७२ ग्रॅमचे दागिने जप्त केले. दोघे चोरटे हे अट्टल चोर असल्याचे समोर आले. या कारवाईमुळे भोसरी पोलिस ठाण्यातील चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले.
पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, मुकेश मोहारे, सहायक फौजदार राकेश बोयने, पोलिस अंमलदार हेमंत खरात, नवनाथ पोटे, प्रकाश भोजणे, प्रतिभा मुळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.