नोकरीचे आमिष; बनावट ऑफर लेटर देऊन फसवणूक, तरुणीला २ लाखांचा गंडा
By नारायण बडगुजर | Published: May 9, 2024 05:47 PM2024-05-09T17:47:38+5:302024-05-09T17:47:58+5:30
तरुणीला बेक्सिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये चार लाख रुपये पॅकेजची नोकरी लावतो, असे आमिष दाखवले
पिंपरी : कंपनीमध्ये नोकरी लावण्यासाठी तरुणीकडून दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर बनावट ऑफर लेटर देऊन तिची फसवणूक केली. वाकड आणि हिंजवडी येथे जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत ही घटना घडली.
प्रदीप उर्फ विक्रांत राजू भोसले (रा. आळंदी), परेश देविदास पाटील (रा. चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी २५ वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी फिर्यादी तरुणीला बेक्सिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये चार लाख रुपये पॅकेजची नोकरी लावतो, असे आमिष दाखवले. संशयितांनी कंपनीचे बनावट ऑफर लेटर तरुणीच्या ईमेलवर पाठवले. तरुणीचा विश्वास संपादन करून तिच्याकडून दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर ते ऑफर लेटर बनावट असल्याचे उघडकीस आले. तरुणीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक शीतल गिरी तपास करीत आहेत.