मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा विरोध; अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी महिलेने घेतली होती उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:17 PM2018-01-24T13:17:22+5:302018-01-24T13:25:07+5:30
अनधिकृत बांधकामविरोधी कारवाईस आलेल्या पथकाला विरोध करीत एका महिलेने इमारतीवरून उडी मारली. त्यात महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला. अधिकाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली.
पिंपरी : अनधिकृत बांधकामविरोधी कारवाई करण्यास आलेल्या पथकाला विरोध करीत एका महिलेने इमारतीवरून उडी मारली. त्यात महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी बुधवारी औंध सर्वोपचार रूग्णालयाजवळ नातेवाईकांनी गर्दी केली होती. अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत महिलेचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आग्रही भूमिका नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक अनधिकृत बांधकामाविरुद्धची कारवाई करण्यासाठी पिंपळे गुरव येथे दाखल झाले. त्यांनी कारवाईसाठी इमारतीतील साहित्य बाहेर काढण्यास सांगितले. त्या वेळी या इमारतीत राहणाऱ्या देवी राम पवार (वय ३०) या महिलेने इमारतीारून उडी मारली. गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी तिच्या नातेवाईकांनी मृतदेह महापालिकेसमोर ठेऊन अधिकाऱ्यांचा निषेध नोंदविणार, असा इशारा दिला होता. त्यामुळे महापालिकेच्या दोन्ही प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक आणि पोलिसांचा ताफा तैनात ठेवण्यात आला होता. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात मिळू शकला नाही. बुधवारी सकाळीच नातेवाईक औंध सर्वोपचार रूग्णालयाजवळ जमा झाले. महिलेच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली. एकत्रित जमलेल्या नातेवाईकांकडून संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या. परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे तसेच अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांची समजूत घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर तणावाची परिस्थिती निवळली.