‘बीआरटी’वरून भाजपात गटबाजी, ‘स्थायी’त चर्चा प्रकल्पाची घाई जीवघेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 03:02 AM2018-01-05T03:02:11+5:302018-01-05T03:04:06+5:30
पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी बीआरटी सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यावरून भाजपातच दोन गट पडले आहे. एक गट प्रशासनाबरोबर असून, दुस-या गटाने बीआरटी प्रकल्पावरून सावध पवित्रा घेतला आहे.
पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी बीआरटी सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यावरून भाजपातच दोन गट पडले आहे. एक गट प्रशासनाबरोबर असून, दुस-या गटाने बीआरटी प्रकल्पावरून सावध पवित्रा घेतला आहे.
स्थायी समितीत बीआरटी प्रकल्पावर चर्चा झाली. या वेळी प्रकल्पासाठीचा निधी मागे गेला तरी चालेल, मात्र या मार्गावर कोणत्याही प्रवाशाचा जीव गेला, तर ते परवडणार नाही, अशी भूमिका स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना दापोडी ते निगडी बीआरटीबाबत सीमा सावळे यांनी आक्षेप घेतला होता. सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली होती. सत्तेत आल्यानंतरही सावळे यांची भूमिका कायम आहे. स्थायी समितीच्या बैठकीत बीआरटी प्रकल्पावर जोरदार चर्चा झाली. बीआरटीवरून सत्ताधारी विरुद्ध प्रशासन असे चित्र निर्माण झाले.
सभापती सावळे आणि आशा शेंडगे यांनी भूमिका मांडली. सावळे म्हणाल्या, ‘‘दापोडी ते निगडी बीआरटी मार्ग कसा चुकीचा आहे, सुरक्षा उपाय केले नसल्याने अपघात होऊ शकतात, ही बाब तत्कालीन नगरसदस्य असताना निदर्शनास आणून दिली होती. मर्ज इन आणि मर्ज आऊट, तसेच अंडरपासच्या ठिकाणी वळणावर प्रभावीपणे सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नाहीत. म्हणून आक्षेप नोंदविले होते. आताही प्रशासन सुरक्षेच्या उपाययोजना न करता प्रकल्प सुरू करण्याची घाई नको.
सत्तेत येऊनही मी आक्षेप घेतले असताना सुरुवातीला आक्षेप घेणाºयांना प्रशासनाने माहिती देणे गरजेचे होते. सुरक्षेसंदर्भात माहिती देण्याचा व पाहणी दौरा असताना काही तास अगोदर मला माहिती दिली, ही बाब चुकीची आहे, असा आक्षेप सीमा सावळे यांनी घेतला.
पुणे-मुंबई महामार्गावरील बीआरटी सेवा सुरू झाली, तर त्याचा फायदा सार्वजनिक वाहतूकसेवा सक्षमीकरणास होणार आहे. पवई आयआयटीने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली आहे. पाहणी केल्यानंतर पथकाचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे. प्रकल्प वेळेत सुरू केला नाही, तर निधीवर परिणाम होईल.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त
निधी मागे गेला तरी चालेल; मात्र या मार्गावर कोणाचा जीव गेला तर परवडणार नाही. सुरक्षा उपाययोजनांची माहिती देणे गरजेचे आहे. बीआरटीमुळे वाहतूक सेवा सुरळीत नाही, तर आणखी जटिल होणार आहे. प्रवाशांनाही याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
- सीमा सावळे, अध्यक्षा स्थायी समिती