टँकर, विहिरी, बोअरमधील पाण्याच्या तपासणीचा नुसताच आदेश!
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: January 29, 2025 10:00 IST2025-01-29T10:00:14+5:302025-01-29T10:00:33+5:30
गुणवत्ता न तपासताच पाणीपुरवठा : खासगी पुरवठ्यावर अंकुश कोणाचा?

टँकर, विहिरी, बोअरमधील पाण्याच्या तपासणीचा नुसताच आदेश!
ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी : दूषित पाण्याद्वारे गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील खासगी विहिरी, बोअरवेल, टँकरमार्फत पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्याची तसेच जारद्वारे वितरित करणाऱ्या ठिकाणांचीही तपासणी करण्याचा आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. मात्र, तरीही शहरात टँकरने पाणीपुरवठा होत आहे. गुणवत्ता न तपासताच सोसायट्यांमध्ये पाणी वितरित केले जात असल्याचे मंगळवारी (दि. २८) ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले.
महापालिकेने जीबीएस रुग्ण आढळलेल्या ठिकाणचे पाण्याचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. ‘जीबीएस’च्या रुग्णांची संख्या चिखली, भोसरी, वाकड, पिंपळे गुरव भागात जास्त आहे. ज्या ठिकाणी महापालिकेचे प्रक्रिया केलेले पाणी येत नाही, अशा भागातील ही संख्या आहे. पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर या भागात थेट विहिरीतून प्रक्रिया न करता थेट सोसायट्यांना पाणी पुरविले जात आहे. महापालिकेचे पाणी अपुरे पडत असल्याने किंवा महापालिका पाणीच देऊ शकत नसल्याने सोसायट्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. मोठ्या सोसायट्यांना रोज २० पेक्षा जास्त टँकर लागत असल्याची व्यथा सोसायटीधारकांनी ‘लोकमत’कडे मांडली.
टँकर कुठून येतात, याची माहितीच नाही!
शहरात रोज हजारो टँकर पाणीपुरवठा करत असले तरी ते पाणी कोठे भरतात, टँकर भरणा केंद्राला येणारे पाणी कसे उपलब्ध होत आहे, ते कॅनॉल किंवा बोअर किंवा विहिरीचे आहे का याची कोणतीही माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे नाही. त्यामुळे ‘जीबीएस’वर नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी टँकर भरणा केंद्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. खासगी टँकर पाणी कोठून आणतात याची माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. पण ‘जीबीएस’चा धोका वाढत असल्याने ही माहिती संकलित केली जाईल. हे पाणी पिण्यास योग्य आहे की नाही हे तपासण्यात येतील, असे सांगत महापालिका अधिकारी बाजू सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.
राजकीय वरदहस्तामुळे मुजोरी
टँकरचालकांना राजकीय वरदहस्त असून प्रचंड मुजोरीला सामोरे जावे लागते. पाणी कुठून आणले, कसे आणले याची कोणतीही माहिती व्यवस्थित दिली जात नाही. पवना व इंद्रायणी नदीच्या बाजूने काही विहिरी आहेत, तर काहींनी थेट नदीतूनच पाणी उचलण्याची व्यवस्था केली आहे. तेथून हे पाणी थेट टँकरमध्ये भरून सोसायट्यांना पुरविले जाते.
गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराची लागण सर्व वयोगटांतील व्यक्तींना होऊ शकते. अत्यल्प रुग्णांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळून येतात. दूषित पाण्याद्वारे या आजाराची बाधा होण्याची शक्यता गृहीत धरून महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. महापालिकेचा पाणीपुरवठा होत असताना कोणत्याही परिस्थितीत दूषित पाण्याचा शिरकाव होणार नाही. आजाराची प्राथमिक लक्षणे आढळलेले संशयित रुग्ण ज्या भागात वास्तव्य करतात, त्या परिसरात महापालिकेच्या नळाद्वारे पुरविल्या जाणाऱ्या पाण्याची तपासणी मोहीम तीव्र करण्याच्या सूचना केल्या आहेत. विहिरींची माहिती संकलित करण्याचेही आदेश दिले आहेत. - शेखर सिंह, आयुक्त, महापालिका