तडीपारीची कारवाई नावापुरतीच, गुन्हेगारांचा शहरात वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 02:10 AM2018-10-04T02:10:50+5:302018-10-04T02:11:15+5:30
गुंडांचा शहरातच वावर : खटल्याची तातडीने सुनावणी घेण्याचा प्रयत्न
विवेक भुसे
पुणे : गुन्हेगार आपल्या परिसरात दहशत पसरवून वेगवेगळे गुन्हे करीत असल्याने त्याच्यावर वचक बसवा यासाठी त्याला पुणे शहर व जिल्ह्यातून एक ते दोन वर्षांसाठी तडीपार करतात़ ही गंभीर कारवाई समजली जाते़ पण गुन्हेगार तडीपार केल्यानंतर काही दिवसातच पुन्हा शहरात लपून छपून राहत असल्याचे दिसून आले आहे़ पोलीस जेवढ्या गुन्हेगारांना वर्षभरात तडीपार करतात, त्यापेक्षा अधिक गुन्हेगार तडीपारीचा भंग करताना दिसून येत आहे.
चिंचवड येथे ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारालाही पोलिसांनी तडीपार केले होते़ तरीही तो तडीपारीचा भंग करुन चिंचवड येऊन हा गुन्हा करत असल्याचे उघड झाले आहे़ पुणे शहर पोलिसांनी गेल्या आठ महिन्यात ९२ जणांना शहर व जिल्ह्यातून तडीपार केले होते़ याच काळात पोलिसांनी वेगवेगळ्या वेळी घेतलेल्या नाका बंदी तसेच कोंबिंग आॅपरेशनमध्ये तब्बल १५० गुन्हेगार आढळून आले आहेत़ त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार त्यांच्या १४२ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे़ काही दिवसांपूर्वीच चतु:श्रृंगी पोलिसांनी एका सराईत घरफोड्याला पकडून त्याच्याकडून तब्बल ३० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले होते़ त्याला पोलिसांनी तडीपार केले होते़ तडीपारीच्या काळातच तो पुणे शहरात येऊन घरफोडी करीत असल्याचे निष्पन्न झाले होते़ अशाप्रकारे अनेक गुन्हेगारांनी ते तडीपार असतानाही खुलेपणे आपल्या परिसरात वावरत असल्याचे वेळोवेळी आढळून आले आहे़
पोलिसांकडून गुन्हेगार चेकींग वाढल्याने तडीपारीचा भंग करणारे गुन्हेगार अधिक संख्येने आढळत असल्याचे दिसून येत आहे़ एखाद्या गुन्हेगारावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे असताना पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरही त्याच्या कारवाया थांबत नाहीत़ तो रहात असलेल्या परिसरात दहशत पसरवून गुन्हे करत राहतो तेव्हा संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्या गुन्हेगाराच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करतात़ तो सहायक पोलीस आयुक्त तपासून पोलीस उपायुक्तांना सादर केला जातो़ पोलीस उपायुक्त त्या प्रस्तावाची छाननी करुन त्यावर सुनावणी घेतात़ त्यानंतर संबंधित गुन्हेगाराला तडीपार करायचे की नाही याचा निर्णय घेतला जातो़ गुन्हेगाराला साधारण एक ते दोन वर्षे शहर व जिल्ह्यातून तडीपार केले जाते़ त्यानंतर पोलीस त्याला ताब्यात घेऊन त्याची दुसºया जिल्ह्यात रवानगी करतात़
याबाबत पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले की, पोलिसांचा अलर्टनेस वाढल्याने तडीपारी आदेशाचा भंग केल्याने गुन्हेगारांची संख्या वाढलेली दिसून येत आहे़ गेल्या महिन्यात तडीपारीचा भंग करणाºया गुन्हेगाराला पकडल्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले़ त्याच्याविरुद्ध २४ तासात दोषारोप पत्र सादर करुन त्याची सुनावणी तातडीने घ्यावी अशी विनंती न्यायालयाला केली. दुसºयाच दिवशी न्यायालयाने त्याची सुनावणी घेतली व त्या गुन्हेगाराला १ वर्षाची शिक्षा व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
तातडीने सुनावणी घेण्यााठी प्रयत्न
तडीपारीचा भंग करणाºया गुन्हेगारांवर वचक बसावा, यासाठी अशा पकडलेल्या गुन्हेगारांवर १४२ अन्वये कारवाई केल्यावर त्याच्यावरील गुन्ह्याची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला करुन अशा गुन्हेगारांना शिक्षा होईल, हे पाहण्याचा प्रयत्न पोलिसांकडून यापुढील काळात केला जाणार आहे़
- शिरीष सरदेशपांडे,
पोलीस उपायुक्त
पोलिसांनी केलेली तडीपारीची कारवाई
वर्ष तडीपार आदेशाचा भंग करणारे
२०१६ १४९ १३२
२०१७ ११४ २६०
२०१८ ९२ १५०
(आॅगस्ट अखेर)