काजल लवटे लाखाची मानकरी, परिस्थितीवर मात करून मिळविले ९५ टक्के गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 02:02 AM2018-06-11T02:02:37+5:302018-06-11T02:02:37+5:30
इच्छा असली की, सर्व काही साध्य होते, ही म्हण खरी करून दाखविली पिंपळे सौदागर येथील अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी काजल लवटे हिने. बिकट परिस्थितीवर मात करीत तिने यश संपादन केले.
रहाटणी - इच्छा असली की, सर्व काही साध्य होते, ही म्हण खरी करून दाखविली पिंपळे सौदागर येथील अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी काजल लवटे हिने. बिकट परिस्थितीवर मात करीत तिने यश संपादन केले. भाड्याच्या छोट्याशा खोलीत अभ्यासाला जागा नसतानाही तिने ही किमया साधली आहे. घरातील सर्व सदस्य झोपल्यावर रात्रभर अभ्यास करून तिने दहावीत ९५ टक्के गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक मिळविला. या यशामुळे महापालिकेच्या बक्षीस योजनेतील लाखाची ती मानकरी ठरली आहे. त्यामुळे तिचे कौतुक होत आहे.
आपल्याला काहीतरी करायचे आहे, ही जिद्द ती उराशी बाळगून होती. एका १० फूट बाय १० फूट रुंदीच्या खोलीत राहात असल्याने अभ्यासाला जागा शिल्लक नसायची. त्यामुळे अभ्यास करणार कसा, हा प्रश्न तिच्यासमोर होता; मात्र न डगमगता ती रात्री घरातील सर्व झोपली की, ती अभ्यासाला बसायची.
मग पहाट कधी झाली त्याचे भानही तिला नसे. पुन्हा आई कामाला गेली की, घरातील काम करून पुन्हा शाळा, मात्र परिस्थितीवर मात करून शाळेत तिने पहिला क्रमांक पटकाविला. तिला उच्चशिक्षित होण्याचे स्वप्न असून समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. पुढील काळात अधिक कष्ट करून आईवडिलांची इच्छा पूर्ण करायची असल्याचे काजल हिने सांगितले. महापालिकेच्या बक्षीस योजनेत लाख रुपये मिळणार ते सर्वच शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे. भविष्यात माझी बहीणही माझ्या पावलावर पाऊल ठेवत जास्तीत जास्त गुण कशी मिळविणार यासाठी तिला मार्गदर्शन करणार आहे. दहावीतील विद्यार्थ्यांनी न घाबरता अभ्यास करावा; तसेच अभ्यासाचा दिनक्रम ठरविला तर जास्त त्रास होत नाही. मेहनतीचे फळ नेहमी चांगलेच मिळते. त्यामुळे आपल्या परिस्थितीला दोष देत बसू नये. त्यावर मात करायला शिकले पाहिजे, असे काजल लवटे हिने सांगितले.
नशिबी अठराविश्वे दारिद्रय असल्याने लवटे कुटुंबीय कामाच्या शोधात १५ वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाले. वडील मजुरी करतात. आई मिळेल ते काम करते. घरची परिस्थिती बेताची. कामाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आईवडील कामावर गेल्यावर घरातील कामाची जबाबदारी काजलवर असे. त्यामुळे शाळा करून घरातील काम हा तिच्या दिनचर्येचा भाग झाला.