कामशेत : महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामाच्या ठिकाणी नाहीत उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 01:58 AM2018-06-10T01:58:51+5:302018-06-10T01:58:51+5:30
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक उड्डाणपुलाच्या कामासाठी दोन्ही बाजूंच्या सेवारस्त्यावर वळवण्यात आली. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीच उपाययोजना केली नसल्याने येथे दिवसाला सुमारे वीस ते पंचवीस छोटे मोठे अपघात होत आहेत.
कामशेत : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक उड्डाणपुलाच्या कामासाठी दोन्ही बाजूंच्या सेवारस्त्यावर वळवण्यात आली. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीच उपाययोजना केली नसल्याने येथे दिवसाला सुमारे वीस ते पंचवीस छोटे मोठे अपघात होत आहेत. त्यात पुण्याकडून येणाऱ्या रस्त्यावरील कामशेत गावात जाणारी वाहतूक बंद केल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मागील वर्षी सुरू झालेले पवनानगर उड्डाणपुलाचे काम मुदत संपून देखील पन्नास टक्केही पूर्ण न झाल्याने सुमारे एक ते दीड किलोमीटरचा हा रस्ता प्रवासासाठी धोकादायक बनला आहे. त्यात अवकाळी पावसामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, स्थानिक नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या सेवारस्त्याच्या कडेला कामशेतमधील अनेक वसाहती व दुकाने आहेत़ त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
त्यात कामशेत पोलिसांनी पुण्याकडून येणारा व कामशेतमध्ये जाणारा फाटा बंद केल्याने स्थानिक नागरिकांना कामशेत खिंडपासून वळसा मारून जावे लागत असल्याने दोन मिनिटांच्या प्रवासासाठी अर्धा तास खर्ची करावा लागत आहे.
हा मार्ग बंदच करायचा होता तर कामाच्या सुरुवातीलाच का बंद केला नाही, असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत. त्यात पवनानगर फाटा येथे जलवाहिनी रस्त्याच्या वर आल्याने येथून जाताना दिवसभरात सुमारे वीस ते पंचवीस दुचाकीस्वार जलवाहिनीवरून चाक घसरून पडत आहेत. यात अनेक जण जखमी होत आहेत. त्यात एखादा दुचाकीस्वार खाली पडून मागून येणाºया मोठ्या वाहनांची त्याला धडक बसल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता असताना संबंधित ठेकेदार कंपनी अधिकाºयांच्या ही गोष्ट लक्षात येत नाही. वारंवार होणाºया अपघातांना जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याच प्रमाणे इतर अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण झाली असून, याचा सर्वांत मोठा त्रास वाहनचालक व स्थानिकांना होत आहे. महामार्गाच्या पलीकडे राहणाºया नागरिकांसह हा रस्ता ओलांडणारे पादचारी, स्थानिक वाहनचालक व मुख्य महामार्गावरील वाहनचालक या भागातून प्रवास करताना घाबरत आहेत.
उड्डाणपुलाच्या कामामुळे सेवा रस्त्यावर वाहतूक वळविली असली तरी या मार्गावर योग्य त्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडतो. तसेच अपघातही घडतात. तरी येथे सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे.
अतिक्रमणे ठरताहेत डोकेदुखी
उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने अगोदरच रस्ता अरुंद झाला असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. अशातच रस्त्यावर होणारी अतिक्रमणे आणखीनच डोकेदुखी ठरत आहेत. अतिक्रमणांमुळे रस्त्यावरुन मार्ग काढताना जीव मेटाकुटीस येत आहे. तसेच किरकोळ अपघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. तरी या पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना राबविल्या जाव्यात, अशी मागणी होत आहे.