कामशेत पोलिसांची कामगिरी : वेश बदलून मध्य प्रदेशातून चोरट्यांना केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 06:33 AM2017-11-18T06:33:09+5:302017-11-18T06:33:32+5:30
कामशेत : महामार्गांवर प्रवासी वाहनांत चो-या करणा-या १३ जणांच्या टोळीतील दोन चोरटे आणि दोन सराफांना कामशेत पोलिसांनी मध्य प्रदेशात वेश बदलून जेरबंद केले.
कामशेत, वडगाव, लोणावळा व इतर अनेक ठिकाणच्या महामार्ग द्रुतगती मार्गावरील बसथांबे, पेट्रोल पंप, हॉटेल व अन्यत्र थांबलेल्या वाहनांमधून मौल्यवान वस्तू, बॅगांची चोरी अनेक वर्षांपासून होत होती. कामशेत हद्दीतील द्रुतगती मार्गावर ताजे गावच्या हद्दीतील पेट्रोल पंप येथे अनेक वेळा सोने व इतर मौल्यवान समानांची चोरी होत होती. या संबंधी अनेक प्रवाशांच्या तक्रारी दाखल होत होत्या. पण, चोर काही सापडत नसल्याने पोलीस प्रशासन हतबल झाले होते. पण पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक व अपर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील व त्यांच्या तपास टीमने मध्य प्रदेशमध्ये जाऊन फिल्मीस्टाईल ने दोन आरोपी व दोन सराफ व्यावसायिकांना अटक केली.
अस्लम अलिहुसेन खान (वय ३२) व फिरोज साबीर खान (वय ३०, दोघे राहणार उखलदा, ता. मनावर, जि. धार, मध्य प्रदेश) आणि सराफ व्यावसायिक अशोक भगवानदास बन्सल (रा. धामनोर, जिल्हा धार, मध्य प्रदेश) व बाळकृष्ण श्रीकृष्ण महाजन (रा. धरमपूर, जिल्हा धार, मध्य प्रदेश) या आरोपींना अटक करण्यात आली.
अनेक वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणा-या महामार्गावरील बस थांबा, हॉटेल व अन्यत्र थांबणा-या प्रवासी वाहने व इतर वाहनांतून प्रवाशांचा ऐवज लुटणा-या टोळीतील दोन जण पोलिसांच्या हाती लागले असून, त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत टोळीत आणखी ११ जण असल्याची माहिती पुढे आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, पोलीस हवालदार गणेश डावकर, हणमंत माने, उमेश मुंडे, महेंद्र वाळुंजकर, संदीप शिंदे, दत्तात्रय खेंगरे, मिथुन धेंडे, समीर शेख, महिला पोलीस शुभांगी पाटील, कोमल राऊत व अवचार आदींनी वेळोवेळी मध्य प्रदेश राज्यातील गावांमध्ये वेशांतर करून दोन आरोपी व दोन सोने चांदी व्यापाºयांना अटक केली.कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन ते चार वर्षांमध्ये कामशेत वडगाव व इतर महामार्ग, द्रुतगती मार्गावर प्रवासी वाहनांमध्ये होणा-या चो-यांच्या संबंधात पोलीस ठाण्यांमध्ये दहा ते अकरा गुन्हे अज्ञात चोरट्यांवर दाखल झाले आहेत. चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत होती.
याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक हक व अपर पोलीस अधीक्षक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी तपास टीम बनवून सप्टेंबर महिन्यात मिळालेल्या तुटपुंज्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये तपास टीमने वेशांतर करून कसून तपास केला असता. मध्य प्रदेश राज्यात धार जिल्ह्यातील खेरवा, खलदा, मनावर, शिवणी, कुरई जिंदवाडा अशा अनेक डोंगराळ भागात चोरांचे वास्तव्य असल्याचे समोर आले. खेरवा व खलदा ही आरोपी राहत असलेल्या ठिकाणी वेशांतर करून विविध चीजवस्तू विकण्याच्या बहाण्याने स्थानिक नागरिकांकडून गुप्तरीत्या माहिती काढण्यात आली.
सराफांनाही अटक : आठ दिवसांची कोठडी-
सप्टेंबर महिन्याच्या २९ तारखेला अस्लम खान या पहिल्या आरोपीला ताब्यात घेऊन कामशेतला आणण्यात आले. यात, त्याला न्यायालयात हजर केले असता दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. याच कालावधीत तपास टीमला पुढील तपासात फिरोज हा दुसरा आरोपी हाताशी लागला. मात्र, या वेळी फिरोजला अटक करताच स्थानिक नागरिक महिला यांनी पोलिसांवर दगडफेक करीत सुमारे दोन ते तीन किलोमीटर पोलिसांच्या गाडीचा पाठलाग केला. दुसरा आरोपी मध्य प्रदेशमधील एका पोलीस ठाण्यात ठेवून स्थानिक पोलिसांच्या मदतीने सराफ व्यावसायिकांकडे चौकशी सुरू केली, त्या वेळी दोन सराफ व्यावसायिकांनी चोरीचे सोने खरेदी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेऊन कामशेत पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंद केला. या प्रकरणात सराफ व्यावसायिकांना आठ दिवसांनी पोलीस कोठडी मिळाली. याप्रकरणी अजून तपास सुरू असून, अन्य आरोपी व चोरीचा माल लवकरच ताब्यात घेऊ, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली.