बहिणाबाई उद्यान टाकणार कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 01:15 AM2018-09-09T01:15:48+5:302018-09-09T01:15:55+5:30
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय सूचनेनुसार बदल करण्यात येत असून, राष्ट्रीय मानकाप्रमाणे सरपटणारे, जलचर आणि उभयचर प्राणी आणि पक्षी यांच्यासाठी कक्ष उभारणे, प्रेक्षक गॅलरी तयार करणे आदी कामे सुरू आहेत.
पिंपरी : संभाजीनगर, चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी उद्यान कात टाकत असून, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय सूचनेनुसार बदल करण्यात येत असून, राष्ट्रीय मानकाप्रमाणे सरपटणारे, जलचर आणि उभयचर प्राणी आणि पक्षी यांच्यासाठी कक्ष उभारणे, प्रेक्षक गॅलरी तयार करणे आदी कामे सुरू आहेत. नूतनीकरणामुळे संंग्रहालयाचे रूपडे बदलणार आहे. त्यासाठी १४ कोटी रुपये खर्च येणार आहे.
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीची ओळख बनलेले संभाजीनगर, चिंचवड येथील प्रभाग क्रमांक १० मध्ये निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान आहे. सन १९९७ मध्ये त्याची निर्मिती करण्यात आली. सात एकर क्षेत्रावर ते उभारले आहे. या ठिकाणी उभयचर आणि जलचर प्राण्यांसाठी अधिवासाची व्यवस्था नसल्याने येथील काही प्राणी कात्रजच्या उद्यानात हलविण्यात आले आहेत. तसेच उद्यानातील सर्पांचा मृत्यू, मगरीची पिले गायब होणे, प्राणी गायब होणे अशी प्रकरणे घडल्याने हे उद्यान चर्चेत आले होते. प्राणी आणि पक्ष्यांची सुरक्षा याबाबत नॅशनल झू अॅथोरिटी आॅफ इंडिया या संस्थेने पाहणी करून काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने याबाबतचा नूतनीकरणाचा आराखडा तयार केला आहे. या संदर्भातील कामाची निविदा २०१५ला प्रसिद्ध केली होती. त्यानंतर राष्टÑवादी काँग्रेसची सत्ता असताना २० मे २०१६ ला कामाचे आदेश दिले होते. प्राणिसंग्रहालयात स्थापत्यविषयक कामे सुरू आहेत. या कामासाठी १४ कोटी ७ हजार ५२१ रुपये खर्च अपेक्षित आहे.
>ऐंशी टक्के कामे पूर्ण
प्रशासकीय इमारतीचे काम सत्तर टक्के झाले आहे. संग्रह कक्ष, कासवासाठी कक्षाचे काम ऐंशी टक्के झाले आहे. तसेच मगरीसाठी कक्ष आणि सरपटणाऱ्या प्राण्यांसाठीच्या कक्षाचे ऐंशी टक्के काम झाले आहे. रुग्णालय आणि मुख्य प्रवेशद्वाराचे काम सुरू आहे.
>असे असेल संग्रहालय
प्रशासकीय इमारत :
संग्रहालयासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार उभारले जाणार. आत गेल्यानंतर तिथे प्रशासकीय इमारत असणार आहे. त्याचे क्षेत्रफळ ३१६ चौरस मीटर असेल. लायब्ररी, सुरक्षा कक्ष, तिकीट घर आणि छोटेसे सभागृहही येथे असेल.
संग्रह कक्ष, मगर आणि सुसर :
संग्रह कक्ष व कामगार खोल्या, तसेच मगर आणि सूसर यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष असेल. १३४३ चौरस मीटर क्षेत्र आहे. मगर आणि सूसर यांना वास्तव्यासाठी लागणारी जागा, पाण्याचे तळे उभारले जाईल.
संशोधन कक्ष : संग्रहालयात १६४ स्वेअर मीटर या क्षेत्रात संशोधन कक्ष असणार आहे. संसर्ग शोध शाळा इमारत असणार आहे. सुरक्षित असा कक्ष असणार असून त्याठिकाणी मगर पिले, कासव, विविध पक्षी असणार आहेत.
सरपटणारे प्राणी :
सरपटणाºया प्राण्यासाठी २१०० चौरस मीटरचा कक्ष असणार असून त्यात संरक्षित कक्ष हा १६०० मीटरचा असणार आहे. सरपटणाºया प्राण्यांना अन्न देणे, जवळून हे प्राणी पाहता येण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
पाण्यातील पक्षी :
पाण्यातील पक्षी ठेवण्यासाठी पिंजरा तयार केला जाणार आहे. १६१६ हे त्याचे क्षेत्रफळ असणार आहे. ८९० क्षेत्रफळाचा तलाव उभारला जाणार असून त्यात दीड मीटर पाण्याची खोली असून त्यात जलचर प्राणी, पक्षी असतील.
उभयचर प्राणी : उभयचर प्राण्यासाठी कक्ष उभारण्यात येणार असून त्याचे क्षेत्रफळ २१८२ चौरस मीटर आहे. त्यात तलाव तयार करण्यात येणार आहे. कासव आदी उभयचर प्राणी विहारसाठी व्यवस्था केली आहे. पाण्यातून उभयचर प्राणी दिसतील अशीही व्यवस्था केली जाणार आहे.
>प्राणिसंग्रहालयाचे काम वेगाने सुरू आहे. २०१६ मध्ये कामाचा आदेश दिला होता. विविध प्रकारची स्थापत्यविषयक कामे पूर्ण होत आली आहेत. आॅक्टोबर २०१८ पर्यंत कामाची मुदत आहे. नॅशनल झू अॅथोरिटीच्या सूचनेनुसार सर्व बदल केले आहेत. लवकरच संग्रहालय नागरिकांसाठी खुले करण्यात येईल. - संजय कांबळे
(कार्यकारी अभियंता, उद्यान विभाग)