बाप रे, मतमोजणीच्या ३७ फेऱ्यांतून जाहीर होणार 'चिंचवड'चा आमदार; १४ तास चालणार मोजणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 12:11 PM2023-03-01T12:11:49+5:302023-03-01T18:45:50+5:30
अवघे काही तास मतमोजणीसाठी राहिल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली...
पिंपरी :चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. मतमोजणीच्या ३७ फेऱ्या पार होतील. गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. सायंकाळी अंतिम निकाल येऊन चिंचवडचा आमदार ठरणार आहे. मतमोजणीसाठी स्व. शंकरराव गावडे भवनमध्ये मोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. अवघे काही तास मतमोजणीसाठी राहिल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये २८ उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी रविवारी ५१० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. मतदारसंघातील २ लाख ८७ हजार ४७९ मतदारांनी मतदान केले आहे. यासाठीच्या मतमोजणीच्या दृष्टीने निवडणूक विभागाने तयारी केली आहे. मतमोजणीसाठी प्रत्येकी १४ टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी १ टेबल असे एकूण १५ टेबल असणार आहेत. १८ पर्यवेक्षक, १८ सहायक आणि १८ सूक्ष्म निरीक्षकांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे.
सुरुवातीला टपाली मतपत्रिकेच्या मोजणीला सुरुवात करण्यात येईल. यानंतर १४ टेबलवर पहिली फेरी सुरू होईल. टप्प्याटप्प्याने मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होतील. शेवटच्या फेरीनंतर यादृच्छिक पद्धतीने व्हीव्हीपॅट काढून ५ व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाईल. प्रत्येक फेरीनंतर झालेल्या मतमोजणीच्या आकडेवारीची उद्घोषणा शंकर अण्णा गावडे कामगार भवन येथून ध्वनिक्षेपकाद्वारे करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या ३७ फेऱ्या झाल्यानंतर चिंचवड विधानसभेच्या आमदार कोण ? याची घोषणा करण्यात येईल.
१४ तास चालणार मोजणी
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे मतदान केंद्र अधिक म्हणजेच ५१० आहे तर २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शिवाय झालेले मतदानदेखील अधिक म्हणजेच २ लाख ८७ हजार ४७९ इतके आहे. याव्यतिरिक्त टपाली मतदानाचादेखील यामध्ये समावेश असणार आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर करण्यासाठी सर्व प्रक्रिया विचारात घेता किमान १४ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
स्ट्राँग रूम परिसरात जमावबंदी
मतमोजणीच्या दिवशी शंकर अण्णा गावडे कामगार भवनाच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू आहे. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या भवनाच्या १०० मीटर परिसरात प्रवेश असणार नाही. मतमोजणीच्या दिवशी अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत तापकीर चौक ते थेरगाव रुग्णालयाकडे जाणारा रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.