विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर करडी नजर; PMPML ने वाढवले चेकर, दररोज एक लाख दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 01:30 PM2022-09-07T13:30:52+5:302022-09-07T13:31:04+5:30
गणेशोत्सवाच्या काळात पीएमपीएमएल बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त
पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या काळात पीएमपीएमएल बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे पीएमपीएमएल प्रशासनाने जादा बस सोडल्या आहेत. प्रवाशांची संख्या जास्त असल्याने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी गणेशोत्सवाच्या काळात पीएमपीएमएलने तिकीट तपासनीस (चेकरची ) संख्या वाढवली आहे. सद्यस्थितीत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून दररोज सुमारे १ लाख रुपये दंड वसूल केला जात असल्याची माहिती आहे.
पीएमपीएमएल प्रशासनातील १०० लिपिकांना तिकीट तपासनीसाचे काम लावले आहे. त्याचबरोबर नियमितपणे चेकर म्हणून काम करणारे कर्मचारी असे एकूण जवळपास ३०० चेकर सध्या चेकर म्हणून काम करीत आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची संख्या जास्त असल्याने सर्व मार्गावर जवळपास ८०० बस जादा सोडण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातूनदेखील मोठ्या प्रमाणावर नागरिक पुण्यात गणपती मंडळाचे देखावे पाहण्यासाठी जात असतात. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधून जवळपास २६६ जादा बस सोडण्यात येत आहेत. परंतु ज्या मार्गावर प्रवाशांची गर्दी आहे. त्याच मार्गावर जादा बस सोडण्यात येत आहेत, असे पीएमपीएमएल प्रशासनाने सांगितले. गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या दिवसात प्रवाशांची संख्या कमी होती. परंतु आता शेवटचे काही दिवस असल्याने प्रवाशांची संख्या वाढल्याचेही पीएमपीएमएलने सांगितले.
रात्रीच्या वेळी सर्वाधिक गर्दी
सद्यस्थितीत रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सर्वाधिक चेकर हे रात्रीच्या वेळी रस्त्यावर दिसून येत आहेत. तसेच रात्रीच्या वेळीच विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाणदेखील जास्त आहे. पीएमपीएमएलचे तिकीट रिक्षा आणि इतर खासगी वाहतुकींपेक्षा कमी आहे. विनातिकीट प्रवाशाला पकडल्यावर ३०० रुपये दंड आकारला जातो. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढून प्रवास करावा, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाने केले आहे.
''सद्यस्थितीत चेकरची संख्या वाढवली आहे. दिवसभरात जवळपास ३०० चेकर सध्या काम करीत आहेत. प्रवाशांची संख्या वाढल्याने या काळात विनातिकीट प्रवास करणारेही आढळून येत आहेत. - दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल''