विजेचे काम करताना सुरक्षिततेचे भान ठेवा
By admin | Published: January 14, 2017 03:06 AM2017-01-14T03:06:34+5:302017-01-14T03:06:34+5:30
विजेचे बहुतांशी अपघात हे सुरक्षेची काळजी न घेतल्यामुळे होतात. त्यामुळे विजेचे कोणतेही काम करताना सुरक्षिततेचे भान ठेवा,
बारामती : विजेचे बहुतांशी अपघात हे सुरक्षेची काळजी न घेतल्यामुळे होतात. त्यामुळे विजेचे कोणतेही काम करताना सुरक्षिततेचे भान ठेवा, असे आवाहन महावितरणच्या बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांनी केले.
विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त महावितरण व विद्युत निरीक्षक कार्यालयाच्या वतीने कविवर्य मोरोपंत नाट्यमंदिरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
इरवाडकर म्हणाले, बारामती परिमंडल अपघातमुक्त करण्यासाठी सर्व अभियंते, जनमित्रांनी प्रयत्न करावेत. विजेमुळे होणारे बहुतांश अपघात हे निष्काळजीपणा व समन्वयाच्या अभावामुळे होतात. त्यामुळे सर्वांनी सुरक्षा साधनांचा आवर्जून वापर करावा. विद्यार्थ्यांनी आपले कुटुंब व समाजात विद्युत सुरक्षेबाबत जागृती करावी.
विद्युत निरीक्षक कार्यालयाचे शाखा अभियंता महेंद्र जगताप व निवृत्त उपकार्यकारी अभियंता श्रीपाद टाकळकर यांनी स्लाईड शोद्वारे विद्युत अपघाताची कारणे व उपाय यावर मार्गदर्शन केले. बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष धनंजय जामदार, अधीक्षक अभियंता केशव सदाकळे, सहायक महाव्यवस्थापक (मा. सं.) वामनराव जाधव यांचीही याप्रसंगी समयोचित भाषणे झाली. विद्युत निरीक्षक ना. ई. पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी अभियंता मधुकर घुमे यांनी आभार मानले. फेरेरो कंपनीच्या वतीने अभियंता सचिन पोंदकुले यांनी महावितरणच्या यंत्रचालकांसाठी ग्लोव्हज् दिले. मुख्य अभियंता इरवाडकर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ते तांत्रिक कर्मचाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले.
सहायक विद्युत निरीक्षक डेकाटे, डायनामिक्स डेअरीज्चे विद्युत अभियंता दरेकर, महापारेषणचे कार्यकारी अभियंता प्रमोद भोसले, महावितरणचे कार्यकारी अभियंता संपतराव दबडे, केशव काळुमाळी, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) विजय गुळदगड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे यांच्यासह बारामती मंडलातील अभियंते, अधिकारी, कर्मचारी तसेच माळेगाव महाविद्यालयाच्या विद्युत अभियांत्रिकी शाखेचे व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)