केरळसारख्या स्थितीचा शहरात धोका; प्रशासनाचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 02:58 AM2018-08-22T02:58:27+5:302018-08-22T03:00:24+5:30
नदीपात्रामध्ये राजरोस भराव टाकला जात असल्याने पात्र होतेय अरुंद
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील नदीपात्रात राजरोसपणे टाकण्यात येणाऱ्या भरावामुळे नदीपात्र अरुंद होत आहे. आगामी काळात रुंद नदीपात्रच न राहिल्यास पूरग्रस्त केरळसारखी परिस्थिती उद्धवते की काय, अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.
शहरातून पवना, इंद्रायणी, मुळा नदी वाहते. यामध्ये पवना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून इमारती उभ्या केल्या जात आहेत. सर्रासपणे पूररेषेच्या आत इमारती उभ्या राहत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी नदीपात्राची रुंदी कमी-कमी होत चालली आहे. पावसाळ्यात पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यास अनेक ठिकाणी नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरते.
चिंचवडगाव, रावेत, काळेवाडी, पिंपरी या ठिकाणी नदीपात्रात अतिक्रमण केले जात आहे. पूररेषा केवळ नावापुरतीच उरली आहे. यापुढील काळात नदीतील पाणी जाण्यापुरते तरी पात्र शिल्लक राहते की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
केवळ पावसाळ्यात धरणातून पाण्याच्या विसर्गावेळीच नदीपात्रालगतच्या अतिक्रमण व घरांचा मुद्दा उपस्थित होतो. इतर वेळी मात्र राजरोसपणे भराव टाकून इमारती उभ्या राहत असताना त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जाते. यामुळे धोका अधिकच वाढत आहे. शहरात अनेक ठिकाणचे नाले बुजवून त्या ठिकाणी इमारती उभारल्या आहेत.
पवनेची पाणीपातळी वाढली
शहरातून पवना, इंद्रायणी, मुळा या नद्या वाहतात. मावळ मुळशीत जोरदार पाऊस सुरू झाल्याने तसेच धरणांमधून पाणी सोडल्याने नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे पवना नदीतील रावेत, चिंचवड, काळेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपरी, पिंपळे गुरव, सांगवी, दापोडी या नदी काठच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुळा नदीवरील वाकड, पिंपळे निलख, सांगवी तसेच इंद्रायणी नदीवरील तळवडे, चिखली भागात नदीत वाढ झाली आहे.
राडारोडा नदीपात्रात
काळेवाडी नदीपात्रालगत ड्रेनेजलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी बुलडोझरच्या साहाय्याने मंगळवारी खोदाई करण्याचे काम सुरू होते. मात्र, खोदाईचा राडारोडा ट्रकमध्ये भरून न नेता नदीलगतच पसरवला जात होता. अशा गोष्टींमुळेच नदीपात्र अरुंद होत आहे.
प्रदूषणात भर
अनेक ठिकाणचे नाले बुजवून इमारती उभ्या केल्या आहेत, तर काही ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था नसल्याने सांडपाणी नदीपात्रात सोडले जाते. यामुळे नदी प्रदूषणात भर पडत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
सीमाभिंतीची मागणी
अतिक्रमण रोखण्यासाठी सीमाभिंत उभारण्याची मागणी होत आहे. सीमाभिंत उभारल्यास अतिक्रमणाला आळा बसण्यास मदत होईल. यासह प्रशस्त नदीपात्र कायम राहील, अशी अपेक्षा आहे.