रॉकेलचा भडका, महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2015 06:14 AM2015-05-11T06:14:31+5:302015-05-11T06:14:31+5:30
स्वयंपाक करीत असताना रॉकेलच्या डब्याला धक्का लागून झालेल्या भडक्यामुळे भाजून अश्विनी मिलिंद बचुटे (वय २०) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नेहरुनगर : स्वयंपाक करीत असताना रॉकेलच्या डब्याला धक्का लागून झालेल्या भडक्यामुळे भाजून अश्विनी मिलिंद बचुटे (वय २०) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिला वाचविण्याचा प्रयत्न करणारा भाऊ विशाल शशेराव जावळे (वय २०), बहीण स्वाती ऋषी गंजाले (वय २६) हे दोघे जखमी झाले आहेत. ही घटना नेहरुनगर येथील विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्पातील प्रज्ञा विकास हौसिंग सोसायटीमध्ये रविवारी सकाळी १० च्या सुमारास घडली.
सहायक पोलीस निरीक्षक एस. बी. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्पामधील प्रज्ञा विकास सोसायटी या इमारत क्रमांक ४ मध्ये दुसऱ्या मजल्यावरील २०५ या सदनिकेत शशेराव किसनराव जावळे हे कुटुंबासह राहतात. काही दिवसांपूर्वीच दोन्ही मुली स्वाती गंजाले व अश्विनी बचुटे या त्यांच्याकडे आल्या होत्या.
रविवारी सकाळी जावळे व त्यांच्या पत्नी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. तर घरामध्ये त्यांचा मुलगा विशाल, अश्विनी, स्वाती हे तिघे बहीण-भाऊ घरामध्ये होते. अश्विनी सकाळी १०च्या सुमारास स्वयंपाक करत असताना शेजारीच असलेल्या रॉकेलच्या डब्याला धक्का लागल्याने त्यातील सर्व रॉकेल खाली सांडले. भडका उडाला. या घटनेत अश्विनी या ७० टक्के भाजल्या तर तिला वाचविताना विशाल व स्वाती हे जखमी झाले. स्वयंपाकखोलीत झालेल्या स्फोटामध्ये घरामधील फ्रिज, पंखा व इतर साहित्य जळाले. मोठा आवाज आल्यानंतर शेजारील रहिवाशांनी जावळे यांच्या घरामध्ये धाव घेतली त्यावेळी धूर येत होता.(वार्ताहर)
तो चिमुकला वाचला
४या घटनेवेळी हॉलमध्ये झोळीमध्ये स्वाती यांचा दोन वर्षांचा मुलगा झोपलेला होता. घटना घडल्यानंतर नागरिकांनी घरामध्ये प्रवेश करून झोळीमध्ये झोपलेल्या चिमुकल्याला तातडीने बाहेर काढले. त्याला कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही. याचबरोबर अश्विनी यांचा ४ वर्षांचा मुलगा व स्वाती यांचा ३ वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत असल्यामुळे तेदेखील सुदैवाने बचावले.
इमारतीमधील अग्निशामक यंत्रणा कुचकामी
४विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्पामध्ये प्रत्येक इमारतींमध्ये सुरक्षेसाठी अग्निशामक दलाची यंत्रणा बसविली आहे. परंतु ती कुचकामी असून, घटना घडलेल्या प्रज्ञा विकास हौसिंग सोसायटीमधील अग्निशामक यंत्रणा व्यवस्थित नाही. वाहिनी खराब झाला असल्याचे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनेच्या वेळी पाहणीत लक्षात आले.