मूर्ती खरेदीप्रकरणात ‘खोदा पहाड निकला चुहा’
By admin | Published: October 21, 2016 04:35 AM2016-10-21T04:35:32+5:302016-10-21T04:35:32+5:30
विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीखरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाल्यानंतर आयुक्तांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीचा अहवाल आजच्या सर्वसाधारण सभेसमोर मांडण्यात आला.
पिंपरी : विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीखरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाल्यानंतर आयुक्तांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीचा अहवाल आजच्या सर्वसाधारण सभेसमोर मांडण्यात आला. या अहवालातून निविदाप्रक्रियेत अनियमितता आहे, मात्र, एक रुपयाचाही गैरव्यवहार झाला नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे भविष्याचा वेध म्हणविणाऱ्या तथाकथित एका वर्तमानपत्राचे स्टिंग आॅपरेशन फोलची चर्चा महापालिका वर्तुळात होती.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मूर्तीखरेदीत गैरव्यवहार झाल्याचा भावनिक मुद्दा उपस्थित करून एका तथाकथित वर्तमानपत्राने एका बिलाच्या आधारे स्टिंग आॅपरेशन करून २५ लाखांच्या निविदेत २४ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा जावईशोध लावून स्वत:ची पाठ बडवून घेतली होती. प्रसिद्धी मिळत असल्याने त्यास भाजपासह शिवसेना, मनसे आदी पक्षांनीही हवा दिली होती. त्यामुळे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी याबाबत द्विसदस्यीय समिती नियुक्त केली होती. त्यानंतर तीन महिन्यांनी अहवाल सादर झाला. त्यात निविदा प्रक्रियेत अनियमितता झाली तरी, गैरव्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
मूर्ती ही कलाकृती आहे
मूर्ती ही कलाकृती आहे. त्यामुळे त्यांचा दर निश्चित करता येत नाही, असे अहवालात म्हटल्याने मूर्ती खरेदीत एकाही रुपयाचा गैरव्यवहार झाला नसल्याचे सिद्ध होते. या प्रकरणाच्या निमित्ताने आयुक्तांनी कागदपत्राचे पालन व्हावे, खरेदीबाबत नियोजन करणे, दरपत्रकांची मागणी करावी. तसेच वारकऱ्यांना भेटऐवजी सुविधा पुरवाव्यात, अशा निविदा प्रक्रियेविषयी काही सूचना केल्या आहेत. अहवाल सादर होताच सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांनी ‘खोदा पहाड निकला चुहा’ अशी उपरोधिक टीका केली.