घटस्फोटासाठी भुलीचे इंजेक्शन देऊन अपहरण; शक्कल लढवून पत्नीने करून घेतली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 02:17 PM2024-06-22T14:17:58+5:302024-06-22T14:18:23+5:30

तिने विरोध करू नये यासाठी पतीने तिला वारंवार भुलीचे इंजेक्शन दिले. हा प्रकार शुक्रवारी (दि. २१) सकाळी उघडकीस आला...

Kidnapping his wife by injecting Bhuli for divorce, she escaped by fighting 'Ashi' | घटस्फोटासाठी भुलीचे इंजेक्शन देऊन अपहरण; शक्कल लढवून पत्नीने करून घेतली सुटका

घटस्फोटासाठी भुलीचे इंजेक्शन देऊन अपहरण; शक्कल लढवून पत्नीने करून घेतली सुटका

पिंपरी : पती, त्याची आई आणि अन्य एकाने मिळून विवाहित महिलेचे वाकड परिसरातून अपहरण केले. महिलेच्या कार्यालयात घुसून तिला फरफटत कारपर्यंत आणून तिला गाडीत घालून नेण्यात आले. दरम्यान, तिने विरोध करू नये यासाठी पतीने तिला वारंवार भुलीचे इंजेक्शन दिले. हा प्रकार शुक्रवारी (दि. २१) सकाळी उघडकीस आला.

याप्रकरणी २७ वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पती सुमित दिलीप शहाणे (वय ३२), पिंगळा दिलीप शहाणे (६०) व विक्रांत (सर्व रा. मुळेवाडी रोड, मंचर, ता. आंबेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित आणि पीडित महिलेचा विवाह ऑगस्ट २०२३ मध्ये झाला. हे दाम्पत्य मूळचे मंचर येथील आहे. त्यांच्यामध्ये वाद झाल्याने पत्नीने घर सोडले होते. काही दिवसांपूर्वी तिने पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड येथे एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम सुरू केले. दरम्यान, पत्नी वाकड येथे काम करत असल्याचा सुगावा तिचा पती सुमितला लागला. त्याने तिचे कामाचे ठिकाण शोधून काढले. बुधवारी (दि. १९ जून) दुपारी त्याने त्याच्या आई आणि कारचालकासोबत कामाच्या ठिकाणी जात ‘घटस्फोटाच्या पेपरवर सही करायची आहे, तू मंचरला चल’ असे सांगितले. मात्र, त्याला महिलेने नकार दिला. त्यामुळे पती आणि सासूने फिर्यादी महिलेला जबरदस्तीने फरफटत कारपर्यंत आणून तिला कारमध्ये बसवले. त्यानंतर महिलेला सुमितने भुलीचे इंजेक्शन दिले. तसेच तिच्याकडील मोबाइल काढून घेतला.

दरम्यान, गुरुवारी (दि. २० जून) दुपारी तिने सुमितला विश्वासात घेतले. तो सांगतोय त्या कागदपत्रांवर सही करते, असे तिने सुमितला म्हटले. त्यानंतर सुमितने गाडी मंचर परिसरात आणली. मात्र, माझी भूल अद्याप उतरली नसल्याचा बहाणा महिलेने केला. एका मंदिरात थांबलेले असताना तिने एका तरुणाला खुणावून मदत मागितली. तरुणाने मंचर पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी महिलेची सुमितच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर महिलेने शुक्रवारी (दि.२१) सकाळी वाकड पोलिस ठाण्यात जाऊन हा प्रकार सांगितला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Kidnapping his wife by injecting Bhuli for divorce, she escaped by fighting 'Ashi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.