चिंचवडच्या मेंढपाळाचे आर्थिक व्यवहारातून अपहरण; बीडमधून सुटका, एकाला अटक
By नारायण बडगुजर | Published: March 5, 2024 04:30 PM2024-03-05T16:30:55+5:302024-03-05T16:31:11+5:30
मेंढपाळ बेलपाने घेऊन येत असताना त्यांना जबरदस्तीने एका चारचाकी वाहनामध्ये बसवून नेण्यात आले होते
पिंपरी : आर्थिक व्यवहारातून चिंचवड येथून मेंढपाळाचे अपहरण केले. सुपारी देऊन भाड्याच्या चारचाकी वाहनातून अपहरण केल्याचे समोर आले. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनने अपहृत मेंढपाळाची बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून सुटका केली.
तुकाराम साधू शिंपले (४०) असे सुटका केलेल्या मेंढपाळाचे नाव आहे. ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब यादव रुपनर (२२, रा. काळ्याची वाडी, ता. धारूर, जि. बीड) याला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली.
पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी सकाळी सातच्या सुमारास चिंचवडगाव येथील धनेश्वर मंदिर येथून एका व्यक्तीचे अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तुकाराम शिंपले यांचे अपहरण झाले असून ते बेलपाने घेऊन येत असताना त्यांना जबरदस्तीने एका चारचाकी वाहनामध्ये बसवून नेण्यात आले होते. वाहनाच्या नंबर प्लेटवर चिखल लावला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोनने या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये काहीजण आढळून आले. ही गाडी बीड जिल्ह्यात गेल्याचे समजल्याने गुन्हे शाखेचे पथक बीडकडे रवाना झाले.
दरम्यान, ज्ञानेश्वर रुपनर हा व्यक्ती बीड येथून चिंचवड येथे आठ दिवसांपूर्वी आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रुपनर याच्यावर पाळत ठेवली. त्याच्यावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली. घरातील कुलूप लावून बंद असलेली एक खोली उघडली असता तिथे तुकाराम शिंपले आढळून आले. पोलिसांनी शिंपले यांची सुटका करत ज्ञानेश्वर रुपनर याला अटक केली. तसेच अपहरणासाठी वापरलेली गाडीही जप्त केली.
ज्ञानेश्वर याचा मामा रघुनाथ नरुटे याच्या शेळ्या मेंढ्या विक्रीत शिंपले यांनी मध्यस्थी केली होती. त्यातील साडेचौदा लाख रुपये खरेदीदाराने न दिल्याने तो शिंपले यांच्याकडे वारंवार पैसे मागत होता. पैसे न दिल्याच्या रागातून रघुनाथ नरुटे याने त्याचा भाचा ज्ञानेश्वर रुपनर आणि त्याचे मित्र संदीप विक्रम नकाते, हंसराज सोळुंके व नितीन जाधव यांना भाडेतत्त्वावरील चारचाकी वाहन देऊन अपहरणाची सुपारी दिली. त्यांनी शिंपले यांचे अपहरण केले होते.
गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, सहायक फौजदार दीपक खरात, जयवंत राऊत, आतिष कुडके, संदेश देशमुख, देवा राऊत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
फरपटत नेऊन गाडीमध्ये कोंबले
तुकाराम शिंपले अंबाजोगाई येथे शेळ्या-मेंढ्या विक्रीसाठी मध्यस्थी करायचे. त्यांनी मध्यस्थी केलेल्या व्यवहारातील पैसे खरेदीदाराने दिले नव्हते. त्यामुळे शिंपले यांनी त्यांच्या पत्नीचे दागिने, शेती विकून काही लोकांचे पैसे दिले. त्यानंतर उपजीविका चालवण्यासाठी ते चिंचवड येथे आले होते. धनेश्वर मंदिराच्या गोशाळेतील गायी राखण्याचे काम करत होते. तसेच त्यांची पत्नी बेलाची पाने विक्री करीत होते. त्यासाठी तुकाराम हे रोज पहाटे बेलाची पाने घेऊन येत होते. नेहमीप्रमाणे ते बेलाची पाने घेऊन जात होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या संशयितांनी त्यांच्यावर झडप घालून फरपटत नेत त्यांना चारचाकी गाडीमध्ये कोंबून अपहरण केले.
सुती पिशवी, चप्पल
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तेथे सुती पिशवी आणि चप्पल मिळून आली. तशी चप्पल ठराविक समाजाचे लोक वापरत असल्याचे दिसून आले. त्यावरून पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली.