वीस लाखांच्या खंडणीसाठी पाणीपुरी विक्रेत्या मुलाचे अपहरण; सहा तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 09:06 AM2022-07-05T09:06:24+5:302022-07-05T09:06:53+5:30
मुलाची सुटका करून पोलिसांनी आरोपींकडून हत्यारासह १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पिंपरी : टोळक्याने अल्पवयीन मुलाचे हिंजवडी येथून अपहरण केले. तसेच २० लाखांची खंडणी मागितली. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तपासचक्रे फिरवली आणि सहा तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. मुलाची सुटका करून पोलिसांनी आरोपींकडून हत्यारासह १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सनी शंकर कश्यप (वय १५, रा. हिंजवडी) असे सुटका करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. लक्ष्मण नथुजी डोंगरे (वय २२), ज्ञानेश्वर सचिन चव्हाण (वय २२), लखन किसन चव्हाण (वय २६, तिघे रा. अश्वीनीपूर तांडा, गाव वरूड, जि . यवतमाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच विधीसंघर्षीत असलेल्या दोन मुलांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी हा शनिवारी रात्री नऊच्या सुमारास पाणीपुरीची हातगाडी घेऊन घराकडे निघाला होता. त्यावेळी आरोपींनी त्याचे एका चारचाकी वाहनातून अपहरण केले. त्यानंतर सनी याचे वडील शंकर कश्यप यांना फोन करून २० लाख रूपयांची मागणी केली. पैसे नाही दिले तर तुमच्या मुलाला मारून टाकू, अशी धमकी दिली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेने तपास सुरू केला. दरम्यान तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी मुलाला घेऊन अहमदनगर रस्त्याने जात असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांचा शोध घेत असताना शिक्रापूर जवळील मलठण फाट्यावर आरोपींची गाडी दिसली. पोलिसांनी आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. तसेच सनीची सुटका केली. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सुनील दहिफळे, सोन्याबापु देशमुख, सहायक निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, तुकाराम खडके, रमेश पवार, कर्मचारी महेश वायबसे, बंडु मारणे, बाळकृष्ण शिंदे, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, कल्पेश बाबर, अरुण नरळे, चंद्रकांत गडदे, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, दत्ता शिंदे, सागर पंडीत, अमित जगताप यांच्या पथकाने ही कामगिरी केली.