अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सात वर्षाच्या बालकाची सुटका, साठ लाखाच्या खंडणीसाठी केले होते अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 11:34 PM2017-09-25T23:34:54+5:302017-09-25T23:35:11+5:30
पूर्णानगर येथील साईनिवास हौसिंग सोसायटीजवळ खेळणाºया ओम या सात वर्षाच्या बालकाला अज्ञात अपहरकर्त्यांनी शनिवारी पळवून नेले होते.
पिंपरी : पूर्णानगर येथील साईनिवास हौसिंग सोसायटीजवळ खेळणाºया ओम या सात वर्षाच्या बालकाला अज्ञात अपहरकर्त्यांनी शनिवारी पळवून नेले होते. घराजवळून नेलेल्या ओमला अपहरणकर्त्याच्या तावडीतून पोलिसांनी सोमवारी सुखरूप परत आणले. तब्बल ७२ तासांनी पोलिसांनी अथक प्रयत्नाने ओमला त्याच्या कुटूंबियांच्या ताब्यात दिले. ओमला सुखरूप ताब्यात दिल्यानंतर नातेवाईकांनी समाधान व्यकत केले. साठ लाखाच्या खंडणीसाठी त्याचे अपहरण करण्यात आले होते. एका ठिकाणी ओमला सोडून अपहरणकर्ते निघून गेले असल्याने ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पूर्णानगर परिसरातून अपहरणकर्त्यांनी ओम ला पळवून नेले. मोबाईलवर त्याच्या वडिलांशी संपर्क साधला. साठ लाख रूपयाच्या खंडणीची त्यांच्याकडे मागणी केली. पोलिसांना माहिती दिल्यास मुलाचे बरेवाईट केले जाईल. असे ओमचे वडिल संदीप खरात यांना धमकावले. ओम चे शनिवारी अपहरण झाल्यानंतर खरात कुटुंबिय हवालदिल झाले. चिंताग्रस्त झालेल्या खरात कुटूंबियांनी खंबीरपणे निर्णय घेऊन पोलिसांकडे धाव घेतली. निगडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने ओमचा शोध घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके, तसेच निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय पळसुले यांनी गुन्हे शाखा पोलीस पथकाच्या साह्याने ओम च्या सुटकेचे प्रयत्न सुरू केले.
अपहरणकर्त्यांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तपास यंत्रणेत त्रुटी राहिल्यास ओमच्या जिवाला धोका होऊ शकतो. हे लक्षात घेऊन विशेष खबरदारी घेऊन रात्रंदिवस ओम साठी शोध मोहिम राबवली. मोबाईल लोकेशन ट्रेस करीत त्यांनी अपहरणकर्त्यांचा मागोवा घेतला. ओम सुखरूप असल्याची खात्री केली. अत्यंत शिताफिने पोलिसांनी ओमची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्याच्या कुटुबियांनी त्यांचे आभार मानले.
मुलाचा पुर्नजन्म
अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मुलाची सुखरूप सुटका करण्यासाठी पोलिसांनी अथक परिश्रम घेतले, हे मी स्वत: अनुभवले. त्यांच्यामुळे माझ्या मुलाचा पुर्नजन्म झाला आहे. आहोरात्र एक करून त्यांनी ओमची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका केली. त्यामुळे पुणे पोलिसांचे आम्ही आभार मानतो.
मुलगा सुखरूप आणणे हेच प्राधान्य
पोलीस पथकाने अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मुलगा सुखरूप कसा आणता येईल. याला प्रथम प्राधान्य दिले. ओमची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी चारशे पोलिसांचे पथक दिवसरात्र काम करीत होते. साठ लाखांच्या खंडणीची मागणी केली असतानाही एक रूपयासुद्धा अपहरणकर्त्यांना न देता, बालकाची सुटका केली. लवकरच आरोपींनाही अटक केली जाईल. त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
-रश्मी शुक्ला
पुणे पोलीस आयुक्त