पाच दिवसांत केले ‘किलीमांजरो’ सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 02:08 AM2018-08-21T02:08:03+5:302018-08-21T02:08:29+5:30
गिर्यारोहक सचिन कणसे या तरुणाने आफ्रिका खंडातील सर्वोच्च किलीमांजरो शिखर सर केले आहे.
सांगवी : पिंपळे निलख येथील गिर्यारोहक सचिन कणसे या तरुणाने आफ्रिका खंडातील सर्वोच्च किलीमांजरो शिखर सर केले आहे. या शिखरावर तिरंगा फडकावत कणसे याने शहरवासीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
पुणे व परिसराचे नाव उंचावणाऱ्या विविध खेळाडू, कलाकार, राजकीय, सामाजिकव इतर क्षेत्रांतील व्यक्तींमध्ये सचिनच्या कामगिरीची नोंद झाली आहे. मोठी बहीण जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्राध्यापिका सविता दगडे यांना सचिनने हे यश समर्पित केले.
अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातून आई-वडिलांनी बहीण सविता व सचिन यांना शिकवले. सविता प्राध्यापिका, तर सचिन वीटभट्टी व्यावसायिक आहे. शाळेत कबड्डी व मैदानी खेळ यामुळे सह्याद्रीच्या रांगा, कडेकपारी पार करत गिर्यारोहणाचे वेड डोक्यात भिनले, असे सचिनने सांगितले. सन २०१६ मध्ये लडाखमधील लेह येथील स्टोक कांग्री, युरोप खंडातील सर्वांत उंच माउंट एलब्रूस शिखर सर केले. गिर्यारोहणासाठी रोज पाच किलोमीटर चालणे, योगासने, नियमित व्यायाम व खेळ यामुळे उंच शिखर सर करणे शक्य झाले, असे सचिनने सांगितले.
बाणेर येथील तुकाई टेकडीवरील वसुंधरा अभियान या सामाजिक संस्थेचा सचिन सभासद आहे. पर्यावरण व विविध सामाजिक कार्यांत तो भाग घेत असतो. शिखर सर केल्यामुळे सचिनवर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तिरंगा फडकावत आई-वडिलांचे छायाचित्र झळकावले
आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर १९ हजार ३४१ फूट उंच आहे. ९ आॅगस्ट रोजी सकाळी सातला प्रत्यक्ष शिखर चढाईसाठी सुरुवात करून १३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ला सचिनने शिखर सर केले. खडतर अशा किलीमांजरो या शिखरावर गिर्यारोहण कालावधीसाठी सात दिवस लागतात. सचिनने मात्र अवघ्या पाच दिवसांत शिखर सर केले; तिरंगा फडकावला. त्यानंतर आपल्या आई-वडिलांचे छायाचित्रही झळकावले.