उद्योगनगरीत तब्बल ४३४ धोकादायक सांगाडे; किवळे अपघातानंतर होर्डिंग पाडण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 02:31 PM2023-04-19T14:31:34+5:302023-04-19T14:35:47+5:30
निरीक्षकांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात...
पिंपरी : महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या वतीने शहरातील अनधिकृत होर्डिंग अधिकृत करण्यासाठी व्यावसायिकांना पायघड्या घालण्यात आल्या. त्यानंतर संबंधित व्यावसायिकांनी अनधिकृत होर्डिंग अधिकृत करण्यासाठी अर्ज केले. मात्र, त्यानंतरही महापालिकेने संबंधित होर्डिंग पाडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निर्माण झालेल्या वादात शहरामध्ये तब्बल ४३४ धोकादायक अनधिकृत होर्डिंग उभे असल्याचे समोर आले आहे.
किवळे येथे धोकादायक असलेले जाहिरात होर्डिंग अंगावर पडल्याने पाच नागरिकांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. असे असताना अनधिकृत जाहिरात होर्डिंग शहरामध्ये उभे कसे राहतात? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याला महापालिका प्रशासनाचा कारभार व उत्पन्न वाढवण्याचा अट्टाहास कारणीभूत ठरला आहे. पालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील अनधिकृत जाहिरात होर्डिंगचे सर्वेक्षण केले. त्यानंतर अनधिकृत आढळलेल्या होर्डिंग मालकांना होर्डिंग अधिकृत करण्यासाठी १८ सप्टेंबर २०२१ ला अर्ज करण्यास सांगितले. ६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ४३४ मालकांनी होर्डिंग अधिकृत करण्यासाठी अर्ज केले. मात्र, त्यानंतर संबंधित सांगाडे धोकादायक असल्याची उपरती महापालिका प्रशासनाला झाली.
महापालिकेने संबंधित होर्डिंग अधिकृत न करता पाडण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाने ११ एप्रिल २०२२ ला संबंधित अनधिकृत होर्डिंग काढण्याबाबत व्यावसायिकांना जाहीर प्रकटनाद्वारे सूचित केले. त्यामुळे पिंपरी चिंचवड जाहिरात असोसिएशन व महापालिका प्रशासन यांच्यामध्ये वाद झाले. याबाबत माहिती देताना महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘या विरोधात व्यावसायिकांनी फसवणूक केल्याचा दावा करत मुंबई येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयामध्ये तब्बल ८ वेळेस सुनावणी झाली. त्यानंतर २१ फेब्रुवारी २०२३ ला न्यायालयाने होर्डिंग ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे शहरामध्ये असलेल्या अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करता आली नाही.’ महापालिका प्रशासनाने भूमिका बदलल्याने अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात आली नाही. परिणामी, शहरामध्ये तब्बल ४३४ धोकादायक अनधिकृत होर्डिंग उभे आहेत.
निरीक्षकांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
शहरात उभारले जाणारे होर्डिंग परवानगीनुसार आहेत की नाही हे तपासण्याची जबाबदारी निरीक्षकांवर असते. अनधिकृत होर्डिंग उभारणी सुरू केल्यानंतर त्याची पाहणी करून नियमात नसेल तर ते काम थांबवण्याची आवश्यकता आहे. मात्र, निरीक्षकांच्या अर्थपूर्ण देवाण-घेवाणीमध्ये शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत जाहिरात होर्डिंग उभे राहत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.