धडाकेबाज आयुक्त कृष्ण प्रकाश यांची एंट्री दखलपात्र; पण गुन्हे नोंद होतात अदखलपात्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 12:24 PM2020-12-06T12:24:36+5:302020-12-06T12:39:16+5:30

Krishna Prakash : आयुक्त कृष्ण प्रकाश पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून हजर झाले. त्यांनी पोलीस खात्यात शिस्तीचा शिरस्ता जपला पाहिजे, असा हुकूम काढला आहे.

Krishna Prakash Pimpri-Chinchwad police chief | धडाकेबाज आयुक्त कृष्ण प्रकाश यांची एंट्री दखलपात्र; पण गुन्हे नोंद होतात अदखलपात्र!

धडाकेबाज आयुक्त कृष्ण प्रकाश यांची एंट्री दखलपात्र; पण गुन्हे नोंद होतात अदखलपात्र!

Next

योगेश्वर माडगूळकर

पिंपरी - पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे आगमन दखलपात्र झाले. पण सध्या पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे अदखलपात्र म्हणून नोंदविण्याचे प्रमाण वाढले आहे. स्टेशन डायरी रिकामी ठेवण्याचा अट्टहास आणि ठाणे अंमलदाराला असणारे कायद्याचे अज्ञान यामागेचे कारण असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आयुक्त कृष्ण प्रकाश पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून हजर झाले. त्यांनी पोलीस खात्यात शिस्तीचा शिरस्ता जपला पाहिजे, असा हुकूम काढला आहे. पण काही पोलीस ठाण्यांमध्ये दखलपात्र गुन्हे अदखलपात्र म्हणून नोंदवले जात असल्याने फौजदारी स्वरुपाचे गुन्हे अदखलपात्र नोंदवण्यामागचे गुपित काय असेल याची चर्चा आहे.

एका विवाहितेच्या पतीने दुसरे लग्न केले. त्याबाबतची पोस्ट फेसबुकवर टाकली. त्या विवाहितेने याबाबत निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीचे काय झाले, हे विचारण्यासाठी पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पोलीस ठाण्याच्या दारातच अडविले. त्यांनी याबाबत थेट पोलीस आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण तिथेही त्यांना आयुक्तांच्या भेटीपासून अडविण्यात आले. त्यानंतर त्यांनी आयुक्तांशी फोनद्वारे संपर्क साधला. आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. पण अजूनही त्या घटनेचा तपास सुरू आहे.

गेल्या चार दिवसांपूर्वी एका विवाहितेने दोन मुली झाल्या म्हणून छळ होत असल्याची तक्रार दाखल केली होती. ती तक्रारही पोलिसांनी अदखलपात्र म्हणून नोंदवून घेतली. ज्या प्रकरणात तातडीने गुन्हे दाखल होण्याची आवश्यकता आहे, ती प्रकरणे अदखलपात्र म्हणून नोंदविण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दखलपात्र तक्रारी अदखलपात्र नोंदविण्याचे प्रकार शक्यतो घडत नाहीत. फिर्यादीने आपल्या तक्रारीचा पाठपुरावा करावा. आपली तक्रार योग्यरित्या लिहून घेतली जाते का? याकडे लक्ष द्यावे. तक्रारीबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भेटावे. त्यांच्याकडून तक्रारीचे निराकारण न झाल्यास सहायक आयुक्तांना भेटावे. वेळप्रसंगी पोलीस आयुक्तांनाही भेटावे.  

- राजेंद्र भामरे, निवृत्त पोलीस अधिकारी

एका विधवा महिलेची ३५ लाखांची फसवणूक झाली आहे. तिची अद्याप तक्रार नोंद झालेली नाही. भारतीय दंड संहितेमध्ये अदखलपात्र गुन्हा नोंदवून त्याबाबतही संबधितांना समज देता येऊ शकते. कागदोपत्री क्राईम रेट शून्य आणण्यापेक्षा पोलिसांनी प्रत्यक्षात काम करावे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या महिलेची तक्रार नोंदवून घेणे गरजेचे आहे.

ॲड. सुप्रिया कोठारी, समुपदेशक

सांगली पॅटर्न पिंपरीत राबविल्यास घटतील गुन्हे

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे सांगली येथे नियुक्तीस असताना त्यांनी वसुली करणाऱ्या पोलिसांना (वसुली अधिकारी) साईड पोस्टिंग दिले होते. त्यामुळे वसुली अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये तक्रार दाखल करण्याकडे पोलीस कानाडोळा करतात. याचाही तपास त्यांनी करावा. पिंपरीचे आयुक्त सांगलीत होते, तेव्हा त्यांनी एका  संघटनेच्या ज्येष्ठ नेत्याला कायद्यासमोर सगळे समान असतात, याची जाणीव करून दिली होती. त्या धडाकेबाज पद्धतीने पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचा कार्यक्रम पोलिसांना द्यावा. तसेच पोलीस ठाण्यांमध्ये दखलपात्र गुन्हे अदखलपात्र होण्याचे कारण काय असेल, याचाही छडा लावावा, अशी भावना शहरवासीयांमध्ये आहे.

 

Web Title: Krishna Prakash Pimpri-Chinchwad police chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.