पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी 'आयर्नमॅन' कृष्णप्रकाश यांची वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 21:38 IST2020-09-02T21:26:26+5:302020-09-02T21:38:56+5:30
संदीप बिष्णोई यांची बदली

पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी 'आयर्नमॅन' कृष्णप्रकाश यांची वर्णी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची बदली झाली असून, आयपीएस अधिकारी ते आयर्नमॅन, अल्ट्रामॅनचा किताब पटकाविलेले कृष्ण प्रकाश यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली आहे. मुंबई येथे पोलीस महासंचालक कार्यालयात विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) म्हणून सध्या ते कार्यरत आहेत.
राज्यातील आयपीएस अधिकाºयांच्या बदल्या झाल्याची चर्चा बुधवारी दिवसभर सुरू होती. त्यात पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची बदली होऊन आयर्नमॅन कृष्ण प्रकाश यांची शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून वर्णी लागल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्या. याबाबत रात्री उशिरा अधिकृत अध्यादेश जारी झाले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय १५ आॅगस्ट २०१८ रोजी कार्यान्वित झाले. त्यावेळी शहराचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून आर. के. पद्मनाभन यांनी पदभार स्वीकारून तोकड्या मनुष्यबळावर कामकाज सुरू केले. २० सप्टेंबर २०१९ रोजी संदीप बिष्णोई यांची शहराच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली. त्यांनी २१ सप्टेंबर २०१९ रोजी आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतली. त्याच दिवशी राज्याच्या विधानसभा निवडणुका जाहीर होऊन आचारसंहिता लागू झाली होती. बिष्णोई यांचा आयुक्त म्हणून एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत असतानाच कृष्ण प्रकाश यांची पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तपदी बदली झाली. शहराचे तिसरे पोलीस आयुक्त म्हणून कृष्ण प्रकाश यांच्याकडे जबाबदारी आली आहे.