दुर्धर आजारांच्या औषधांचा अभाव

By admin | Published: November 26, 2015 12:51 AM2015-11-26T00:51:53+5:302015-11-26T00:51:53+5:30

अल्प दरात जेनेरिक औषधविक्रीचे ‘जन औषधी’ स्टोअर येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबॉयोटिक्स (एचए) कंपनीने सुरू केले आहे.

Lack of ill health drugs | दुर्धर आजारांच्या औषधांचा अभाव

दुर्धर आजारांच्या औषधांचा अभाव

Next

पिंपरी : अल्प दरात जेनेरिक औषधविक्रीचे ‘जन औषधी’ स्टोअर येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबॉयोटिक्स (एचए) कंपनीने सुरू केले आहे. मात्र तेथे कर्करोग, मूत्रपिंडाचे विकार, थायरॉईड, मनोविकार अशा दुर्धर आजारांवर औषधेच नसल्याने रुग्णांची गैरसोय होते. येथे येऊन रिकाम्या हातांनी फिरावे लागते. तसेच, इतर आजारांवरील औषधांचा पुरवठा अनियमित असल्याने वारंवार हेलपाटे मारावे लागतात.
बाजारातील महागडी औषधे खरेदी करणे परवडत नसल्याने गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना औषधांअभावी हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. ऐपत नसल्याने औषधांअभावी अनेकांचा मृत्यू ओढविल्याची अनेक उदाहरणे आहेत. हे रोखण्यासाठी गरीब, गरजू आणि सर्वसामान्य रुग्णांसाठी केंद्र शासनाने येथील एचए कंपनी कॉलनीच्या प्रवेशद्वारावर गेल्या वर्षी जनऔषधी स्टोअर सुरू केले. स्टोअरमध्ये बाजारातील औषधांपेक्षा ५० ते ७० टक्के कमी किमतीने औषधे मिळतात. रक्तदाब, हृदयविकार, पोटाचे विकार, मधुमेह, तसेच सर्दी, खोकला, थंडी, ताप आणि टॉनिकची औषधे उपलब्ध आहेत. मात्र कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार, थायरॉईड, मनोविकार अशा दुर्धर आजारावरील औषधे उपलब्ध नाहीत. ही औषधे मिळतील म्हणून राज्यभरातून रुग्णांचे नातेवाईक मोठ्या आशेने येथे येतात. गेल्या महिन्यात उस्मानाबाद येथील २० वर्षांच्या तरुणीसाठी कर्करोगाच्या औषधांसाठी तिचे पालक आले होते. तसेच, मराठवाड्यातून मूत्रपिंड विकारग्रस्त तरुणांचे वडील आले होते. येथे ती औषधे न मिळाल्याने ते बराच वेळ तेथे रडत बसले होते.
स्टोअरमध्ये उपलब्ध औषधांचा साठा लवकर संपत असल्याने तो वेळेवर पुरविला जात नाही. त्यामुळे यादीतील औषधांसाठीही अनेकदा चकरा माराव्या लागतात. ‘लोकमत’ प्रतिनिधीसमोरच चिंचवड येथून एक जण वडिलांच्या मधुमेह आणि रक्तदाबाच्या औषधाची यादी घेऊन आला. स्क्रिप्टमधील ७ पैकी एकही औषध शिल्लक नव्हते. त्यांना माघारी जावे लागले.(प्रतिनिधी)
केंद्र शासनाच्या एचएएल, आयडीपीएल, केएपीएल, आरएपीएल, बंगाल केमिकल या कंपन्या औषधांचे उत्पादन करतात. तेथील औषधे येथे उपलब्ध आहेत. कर्करोग, मूत्रपिंडाचे विकार, थॉयरॉईड, मनोविकार या आजारावरील औषधे उत्पादित केले जात नसल्याने त्यांचा पुरवठायादीत समावेश नाही. खासगी कंपन्यांनी २० टक्के प्रमाणात जेनेरिक औषधे बनविण्याचा नियम आहे. मात्र, त्यांची अंमलबजावणी होत नाही. तसे झाल्यास नागरिकांना २० ते ३० टक्के स्वस्त दराने ती औषधे उपलब्ध होतील. सरकारच्या काही कंपन्यांत उत्पादन पुरेशा प्रमाणात होत नसल्याने पुरवठा मर्यादित आहे.
- हेबती कांबळे, स्टोअर समन्वयक

Web Title: Lack of ill health drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.