जागेअभावी तीन चिमुकल्यांचा उपचार एकाच बेडवर! वायसीएम रुग्णालयातील स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 10:27 AM2021-09-27T10:27:06+5:302021-09-27T10:48:07+5:30
सद्यस्थितीत रुग्णालयाची इमारत कमी पडत आहे. तसेच शहराबरोबर जिल्ह्याभरातून रुग्ण उपचार घेण्यासाठी रुग्णालयात येत असतात
तेजस टवलारकर-
पिंपरी-चिंचवड : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात मागील काही दिवसांपासून प्रसूतींची संख्या वाढली आहे. तसेच बालरोग विभागाची जागा अपुरी पडत आहे. परिणामी एकाच बेडवर तीन मुलांना उपचार दिले जात असल्याची स्थिती आहे. वायसीएम रुग्णालयात प्रसूतीसाठी ४ टेबल आहेत. प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर उपचार देण्यासाठी १६ बेड आहेत. परंतु सद्यस्थितीत दिवसाला ३० ते ३५ महिला प्रसूतीसाठी दाखल होत आहेत. त्यापैकी सिझर आणि नॉर्मल मिळून एकूण २५ ते ३० प्रसूती होत आहेत. तसेच बालरोग विभागासाठी नवजात बालकांसाठी एक वार्ड असून, त्यामध्ये ३५ बेडची क्षमता आहे. तसेच एक महिना ते १२ वर्षांच्या बालकांसाठी एक वार्ड आहे, त्यामध्ये ३५ बेड आहेत.
सद्यस्थितीत रुग्णालयाची इमारत कमी पडत आहे. तसेच शहराबरोबर जिल्ह्याभरातून रुग्ण उपचार घेण्यासाठी रुग्णालयात येत असतात. तसेच प्रसूतीसाठी आलेल्यांना जागा नाही म्हणून वापस पाठविणे किंवा इतर रुग्णालयात पाठविणे योग्य नाही. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला उपचार दिले जात आहेत, असे येथील एका डॉक्टरने नाव न सांगण्याच्या अटीवर लोकमतला सांगितले.
Indore-Daund Express: इंदौर-दौंड एक्सप्रेसचा मुंबई-पुणे मार्गावर अपघात
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने रुग्णालयात इतर आजारांच्या रुग्णांवर उपचार करणे सुरू झाले आहे. सद्यस्थितीत बाह्यरुग्ण विभागात दिवसाला १२०० ते १५०० रुग्णांची ओपीडी होत आहे. तसेच दिवसाला सरासरी लहान मोठ्या ३० ते ५० शस्त्रक्रिया होत आहेत. तसेच कोरोना रुग्णावरतीही उपचार केले जात आहेत. परिणामी रुग्णालयावरचा ताण वाढला आहे.
प्रसूती विभागाची सद्यस्थिती-
प्रत्यक्ष प्रसूतीसाठीचे टेबल : ४
प्रसूतीपूर्व आणि नंतर दाखल करण्यासाठीचे बेड : १६
प्रसूतीसाठी येणाऱ्यांची अपेक्षित संख्या २०
दिवसाला प्रत्यक्षात येणाऱ्यांची संख्या : ३५ ते ४०
दिवसाला होणाऱ्या प्रसूती : २५ ते ३०
क्षमता वाढविणे आवश्यक
रुग्णालयात होणाऱ्या प्रसूतींची संख्या पाहता प्रत्यक्ष प्रसूतीसाठी असेल्या टेबलची संख्या ८ करणे आवश्यक आहे.
तसेच प्रसूतीपूर्व आणि नंतर दाखल करून उपचार करण्यासाठी असेल्या बेडची क्षमता वाढवून २० ते २५ करणे गरजेचे आहे.
बालरोग विभागाची स्थिती
नुकते जन्मलेल्या बालकांसाठी ३५ बेडचा एक वार्ड
गंभीर असलेल्यांसाठी : १७ बेड
कमी गंभीर असलेल्यांसाठी : १० बेड
स्थिर असेल्यांसाठी : १०
१ महिना ते १२ वर्षांच्या बालकांसाठी एक वार्ड
बेड क्षमता : ३५
अजून एक ३५ बेडचा वार्ड वाढविण्याची आवश्यकता
कोरोनामुळे जागेची अडचण
संभाव्य तीसऱ्या लाटेच्या अनुषगांने लहान मुलांसाठी एक आयसीयू वार्ड तयार करण्यात आला होता. परंतु सद्यस्थितीत त्यामध्ये कोरोना रुग्णांवरती उपचार केले जात आहे. त्यामुळे तो वार्ड बालरोग विभागाला मिळालेला नाही.