स्वाइन फ्लू लशीचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 03:05 AM2017-08-04T03:05:41+5:302017-08-04T03:05:44+5:30
पावसाळा सुरू झाल्यापासून स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. शहरात स्वाइन फ्लूसदृश आजाराची लक्षणे आढळून येणाºया रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.
पिंपरी : पावसाळा सुरू झाल्यापासून स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. शहरात स्वाइन फ्लूसदृश आजाराची लक्षणे आढळून येणाºया रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. वर्षभरात २७ रुग्ण दगावले, २१९ जणांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. महापालिकेच्या रुग्णालयांत मात्र स्वाइन फ्लू प्रतिबंधासाठी देण्यात येणारी लस, टॅमी फ्लू गोळ्या आणि अन्य औषधांचा तुटवडा असल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात स्वाइन फ्लूची लस अथवा गोळ्या घेण्यास जाणाºयांना लस उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले जात आहे. वर्षभरात महापालिकेने सुमारे ६ हजार रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या वाटप केल्या आहेत. त्याची महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंद आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले असूनही महापालिकेने औषध आणि लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची दक्षता घेतलेली नाही. स्वाइन फ्लूची लस देण्यासाठी उघडली असता, अर्धा तासाच्या आत त्या लसीची मात्रा किमान सहा रुग्णांना द्यावी लागते. प्रत्येक वेळी सहा रुग्ण असतीलच असे नाही़ त्यामुळे रुग्णालयात लस, औषधसाठा ठेवण्याकडे दुर्लक्ष केले जाऊ लागले आहे.
खासगी विशिष्ट औषध दुकानांमध्ये स्वाइन फ्लूची लस, औषध, गोळ्या उपलब्ध आहेत. मात्र, नेमके कोणत्या औषध विक्रेत्याकडे स्वाइन फ्लूची लस मिळेल, याची माहिती नसल्याने रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक हतबलता व्यक्त करू लागले आहेत. औषध विके्रत्यांनाही कोणत्या रुग्णास लस विक्री केली, त्याच्या तपशिलाची नोंद ठेवणे बंधनकारक केले आहे. रेकॉर्डची नोंद ठेवण्याची कटकट वाटू लागल्याने खासगी औषध विक्रेते स्वाइन फ्लूची औषध, लस ठेवणे टाळू लागले आहेत. शासकीय रुग्णालये, तसेच खासगी औषध विक्रेते यापैकी कोणाकडेही स्वाइन फ्लूचे औषध मिळत नसल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे.