गुन्ह्याच्या तपासासाठी आली अन् एसीबीच्या जाळ्यात अडकली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 03:23 PM2022-07-01T15:23:45+5:302022-07-01T15:25:01+5:30
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सापळा रचून कारवाई...
पिंपरी : हाॅस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटर सील न करण्यासाठी व गुन्ह्याच्या तपासामध्ये सहकार्य करण्यासाठी महिला डाॅक्टरकडे पाच लाखांची लाच मागितली. त्यातील दोन लाखांची लाच स्वीकारताना सहायक पोलीस निरीक्षक महिलेला रंगेहाथ पकडण्यात आले. निगडी येथील खासगी रुग्णालयात गुरुवारी (दि. ३०) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली.
सिंधुदुर्ग पोलिसांच्या महिला अत्याचार निवारण कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक नलिनी शंकर शिंदे असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस अधिकारी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ६२ वर्षीय महिला डाॅक्टरने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नलिनी शिंदे यांच्याकडे होता. त्या गुन्ह्याच्या तपासासाठी शिंदे या निगडी येथे आल्या होत्या. तक्रार महिला डाॅक्टर यांच्या हाॅस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटर सील न करण्यासाठी नलिनी शिंदे यांनी पाच लाखांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार महिला डाॅक्टरने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली. यात नलिनी शिंदे गुन्ह्याच्या तपासासाठी आल्या असताना दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.