त्या जोडप्यांना लाखाचे अनुदान, दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 06:13 AM2017-12-07T06:13:39+5:302017-12-07T06:13:47+5:30
धडधाकट वधू किंवा वराने दिव्यांगाचा स्वीकार करून विवाह केल्यास त्यांना चांगले जीवन जगता येणार आहे. यासाठी दिव्यांग विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जोडप्याला एक लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
पिंपरी : धडधाकट वधू किंवा वराने दिव्यांगाचा स्वीकार करून विवाह केल्यास त्यांना चांगले जीवन जगता येणार आहे. यासाठी दिव्यांग विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जोडप्याला एक लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या प्रस्तावाला महिला व बालकल्याण समितीने आयत्या वेळी मान्यता दिली.
महिला व बाल कल्याण समितीची बैठक नुकतीच झाली. अध्यक्षस्थानी सभापती सुनीता तापकीर होत्या. समितीच्या बैठकीस सागर अंगोळकर, डॉ. वैशाली घोडेकर, योगिता नागरगोजे, प्रा. सोनाली गव्हाणे, चंदा लोखंडे, सुलक्षणा धर, निकिता कदम, रेखा दर्शिले आदी उपस्थित होते.
दरम्यान, कोपर्डी प्रकरणातील तीनही दोषींना फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल समितीने अहमदनगर न्यायालयाच्या निर्णयाचा स्वागत केले. पीडित निर्भयाला
श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. महिलांवरील अत्याचार प्रवृत्तीचा सदस्यांनी निषेध केला.
सभेत किडस् सिटीचा विषय मंजूर करण्यात आला. सिटीमुळे शहरातील लहान मुलांना विविध कामकाजाचे प्रात्यक्षिक मिळणार असून, प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव घेता येणार आहे. मुलांच्या व्यावसायिक ज्ञानात भर पडणार आहे. त्यासाठी महिला व बाल कल्याण निधीतून सुमारे चाळीस कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. समितीच्या शिफारशीसह हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आला.