हल्ल्यातील जखमीचा रुग्णालयात मृत्यू ,लांडगे हत्याप्रकरणातील आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:57 PM2018-07-03T12:57:50+5:302018-07-03T13:00:29+5:30
अंकुश लांडगे यांच्या हत्येतील आरोपीवर पाळत ठेऊन सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास धावडेवस्ती भोसरी येथे अज्ञातांनी हल्ला चढविला.या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता.
पिंपरी : भाजपाचे तत्कालीन शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी जितू पुजारी याच्यावर सोमवारी रात्री अज्ञातांनी खुनीहल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जीतूचा मंगळवारी (दि. ३ जुलै ) पहाटे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जितेंद्र ऊर्फ जितू जितेंद्र रामचंद्र साळुंखे ऊर्फ जितू पुजारी (वय ३२ , रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. भोसरी पोलीस पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.
अंकुश लांडगे यांच्या हत्येतील मुख्य आरोपी गोट्या धावडे याच्या बरोबर जितू याला अटक करण्यात आली होती. जितू याच्यावर लांडगे यांच्या हत्येव्यतिरिक्त बलात्काराचा गुन्हा देखील दाखल होता. यासाठी त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली होती. धावडे याची कालांतराने सुटका झाली. मात्र, जितू बलात्काराच्या गुन्ह्यातील शिक्षा भोगत होता. गोट्या याच्या खुनानंतर काही महिन्यांनी जितू कारागृहातून बाहेर आला होता. त्याच्यावर पाळत ठेऊन सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास धावडेवस्ती भोसरी येथे अज्ञातांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. अखेर मंगळवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. अंकुश लांडगे हत्याप्रकरणातील आरोपी गोट्या धावडे याचाही असाच खून झाला होता