कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या जेवणात आढळल्या अळ्या; पिंपरीतील जिजामाता रुग्णालय प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 11:45 AM2020-08-18T11:45:40+5:302020-08-18T11:46:26+5:30
महापालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप
पिंपरी : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याच्या तक्रारी वाढत असतानाच जेवणात अळ्या आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात हा प्रकार घडला. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे असे प्रकार घडत असल्याचे आरोप त्यांच्याकडून केले जात आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज आठशे ते एक हजारावर रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे शहरवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे. असे असतानाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या जेवणाबाबत तक्रारींमध्ये भर पडत आहे. या रुग्णांना जेवण पुरविण्यासाठी खासगी संस्थांना महापालिकेने कंत्राट दिले आहे. मात्र या संस्था निकृष्ट जेवण देत असल्याचे आरोप होत आहेत.
बेचव असल्याने जेवण टाकून दिल्याचे प्रकार जिजामाता रुग्णालयामध्ये सातत्याने घडत आहेत. तेथील रुग्ण याबाबत तक्रार करीत आहेत. तसेच काही सामाजिक कार्यकर्ते व माकपतर्फे देखील महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले. मात्र त्यानंतरही जेवणाचा दर्जा सुधारण्यात आलेला नाही, असे आरोप होत आहेत.
जिजामाता रुग्णालयातील कोरोना रुग्णांना शनिवारी (दि. १५) जेवण देण्यात आले. त्यावेळी ताटामध्ये अळ्या आढळल्या. याबाबत रुग्णांनी तक्रार केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने रुग्णांनी त्याचा व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. त्यामुळे हा प्रकार समोर आला आहे.
महापालिकेने जेवणाचे कंत्राट दिलेले ठेकेदार याला जबाबदार आहेत. संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी माकपच्या शहर समितीचे सचिव गणेश दराडे यांनी केली आहे.
............
जिजामाता रुग्णालयातील कोरोना रुग्णांच्या जेवणात अळ्या आढळल्या किंवा कसे याबाबत चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर योग्य कार्यवाही होईल तसेच दोषींवर कारवाई होईल.
- अजित पवार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका