माऊलींच्या आळंदीतील नाथपार मंदिराचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:34 PM2018-11-13T23:34:28+5:302018-11-13T23:35:57+5:30
हरिनामाचा गजर : विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
आळंदी : माऊली मंदिरातील संत एकनाथ पार नूतनीकरण व संत एकनाथ पार जीर्णोद्धारात शांतिब्रह्म संत एकनाथमहाराज यांच्या मूर्तीची वेदमंत्र जयघोषासह हरिनाम गजरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी प्राणप्रतिष्ठापना उत्साहात करण्यात आली. शांतिब्रह्म श्री एकनाथमहाराज मिशन पैठण यांच्या वतीने श्री एकनाथमहाराज पार जीर्णोद्धार समिती पुणेच्या माध्यमातून आणि श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटी आळंदी यांच्या सहकार्य व मान्यतेने माऊली मंदिरातील संत एकनाथ पाराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या नूतनीकरण झालेल्या वैभवी विकासकामाचे मंदिरात लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील,विश्वस्त अजित कुलकर्णी,पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर,शांतिब्रह्म मारोती महाराज कुरेकर,व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,प्रफुल्ल प्रसादे,विनीत महाराज गोसावी, योगीराज महाराज गोसावी आदी उपस्थित होते. या निमित्त माउली मंदीरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले.यात महाभिषेख,संत एकनाथ महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना,पार जीर्णोद्धार लोकार्पण, मारोती महाराज कुरेकर यांचे कीर्तन, महाप्रसाद,विनीत महाराज गोसावी यांचे प्रवचन,परंपरेने वारकरी शिक्षण संस्थेचे प्रवचन,संत ज्ञानेश्वर महाराज व संत एकनाथ महाराज यांचा हरिपाठ,योगीराज महाराज गोसावी यांचे हरिकीर्तन,महाप्रसाद आदी कार्यक्रम झाले. उद्या बुधवारी (दि.१४) ज्ञानेश्वरमहाराज कदम यांच्या काल्याचे कीर्तन व महाप्रसाद होणार आहे. माउली मंदिरात नागापूरकर मंडपालगत असलेला संत एकनाथ पार माउली मंदिरातील वैभव आहे. येथील लक्षवेधी आकर्षक दगडी बांधकाम मूळ ढाचा कायम ठेवत नूतनीकरण करण्यात आले.या पारात संत एकनाथमहाराज यांचे पादुकांसमवेत आता श्री संत एकनाथमहाराज यांची वैभवी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करून विराजमान करण्यात आली.
माऊली मंदिरात ज्या ठिकाणी नाथमहाराज प्रथम थांबले ते ठिकाणी म्हणजे संत एकनाथ पार होय.पुढे तीन दिवस श्रींचा संवाद झाला. नाथमहाराजांनी आळंदीचे अरण्यात श्रींची समाधी शोधून काढली. श्रींचे कंठाला लागलेली मुळी काढून बाहेर आणून अजानबागेत लावली. त्यावेळेस संत एकनाथ महाराज यांचे समवेत आलेले शिष्य पुढे आळंदीत राहिले. येथे नंतर अधिकची लोकवस्ती विकसित झाली. त्यानंतर नाथ महाराज यांनी कार्तिकी वारी सुरु केली. माऊलींचे ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण करून भाविकांना उपलब्ध करून दिली. माउली मंदिरात असलेल्या वैभवी नाथ पारचे जिर्णोद्धाराचे काम हाती घेऊन लोकसहभागातून पूर्ण करण्यात आले.