वकिलाचे अपहरण करून खून, मृतदेह जाळून पुरावा नष्ट; CCTV मधील टेम्पोमुळे खुनाचा उलघडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 10:28 AM2023-01-06T10:28:10+5:302023-01-06T10:29:12+5:30

पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाले केला वकिलाच्या खुनाचा उलगडा

Lawyer kidnapped and killed, body burned and evidence destroyed; Tempo in CCTV reveals the murder | वकिलाचे अपहरण करून खून, मृतदेह जाळून पुरावा नष्ट; CCTV मधील टेम्पोमुळे खुनाचा उलघडा

वकिलाचे अपहरण करून खून, मृतदेह जाळून पुरावा नष्ट; CCTV मधील टेम्पोमुळे खुनाचा उलघडा

Next

पिंपरी : अनैतिक संबंधांच्या संशयावरून पिंपरी-चिंचवड शहरातील वकिलाचे अपहरण करून खून केला. महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर मृतदेह जाळून आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अपहरणासाठी वापरलेल्या टेम्पोवरून आरोपी निष्पन्न करून पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने ही कामगिरी केली.

शिवशंकर दत्तात्रय शिंदे असे खून झालेल्या वकिलाचे नाव आहे. राजेश्वर गणपत जाधव (वय ४२), सतीश माणिकराव इंगळे (२७), बालाजी मारुती एलनवर (२४, सर्व रा. भक्तापूर, देंगलूर, नांदेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशंकर शिंदे यांचे विजयनगर, काळेवाडी येथील त्यांच्या कार्यालयातून ३१ डिसेंबरला अपहरण झाले. त्याबाबत कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. घातपाताची शक्यता असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. दरम्यान, शिंदे यांच्या वर्णनाच्या व्यक्तीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत तेलंगणा राज्यात महाराष्ट्र सीमेवर आढळला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पथकांनी तेलंगणा येथे धाव मृतदेह ताब्यात घेतला.

पोलिस उपायुक्त डाॅ. काकासाहेब डोळे, स्वप्ना गोरे, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर, श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने, पोलिस कर्मचारी हजरत पठाण, प्रवीण तापकीर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाधर चव्हाण, गणेश मेदगे, विजय गंभिरे, सुनील चौधरी, मयूर दळवी, नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, राम मोहिते, शुभम कदम, ज्ञानेश्वर गिरी व तौसिफ शेख यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

अनैतिक संबंधाचा संशय

राजेश्वर जाधव याची नातेवाईक महिला वकिलाच्या कार्यालयात कामाला होती. त्यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. याचा राग मनात धरून आरोपीने वकिलाचे अपहरण केले. त्यासाठी चिखली येथून ड्रम खरेदी केले. हात-पाय बांधून वकिलाला ड्रममध्ये कोंबून टेम्पोतून आरोपी त्याच्या मूळ गावी भक्तापूर, नांदेड येथे घेऊन गेला. तेथे जाऊन ड्रम उघडले असता वकिलाचा मृत्यू झाल्याचे दिसले. त्यानंतर तेलंगणामध्ये त्याने मृतदेह जाळला.

...अशी झाली गुन्ह्याची उकल

पोलिसांना शिवशंकर शिंदे यांच्या ऑफिसमध्ये रक्ताचा ठिपका व शर्टची तुटलेली दोन बटणं मिळाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपीचा टेम्पो दिसून आला. त्यावरून माग काढून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. वकिलाचा खून केल्याची आरोपींनी पोलिसांकडे कबुली दिली.

Web Title: Lawyer kidnapped and killed, body burned and evidence destroyed; Tempo in CCTV reveals the murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.